दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१०/२०२३

जळगाव जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गोवंशाच्या गाय, बैलांना लंम्पी या त्वचारोगाची लागण झाली आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने याचा संसर्ग होऊन मोठ्या प्रमाणात आजाराची लागण होत असल्याने मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी जळगाव जिल्ह्यातील गुरांच्या बाजारात गोवंशीय गाय व बैलांचा बाजार भरवण्यासाठी बंदी घातली आहे.

या गाय व बैल बाजार बंदीचे पशुधन पालकांनी काटेकोरपणे पालन करत आपल्या जवळील पशुधन लंम्पी आजारापासून वाचवण्यासाठी लगेचच लसीकरण करुन घेत एकमेकांची गुरेढोरे एकत्रित येणार नाही याची परिपूर्ण काळजी घेत आहेत. कारण पशुधन पालकांच्या मते एक, दोन महिने गाय व बैलांचा बाजार बंद राहिला तरी चालेल पण आमची किमती पशुधनाचा या आजारापासून बचाव होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

परंतु मागील आठवड्यात पासून काही गुराढोरांच्या व्यापाऱ्यांनी स्वताचे व्यवसाय ठप्प झाले असल्याने त्यांच्या दलांलामार्फत व स्वताहून पशुधन पालकांची थेट भेट घेऊन तसेच भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन तुम्ही गुरांच्या बाजारात गायी व बैल विक्रीसाठी घेऊन या व बाजारात धिंगाणा घाला असे सांगून दिनांक ०५ ऑक्टोंबर २०२३ गुरुवार रोजी वरखेडी येथील गुरांच्या बाजारात धिंगाणा घातला होता. तरी अश्या चिथावणीखोर व्यापारी व दलालांचा तपास करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. तसेच या चिथावणीखोर व्यापारी व दलालांमध्ये पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील आसपासच्या खेड्यातील व जामनेर तालुक्यातील काही व्यापारी व दलालांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.

याची दखल घेत पाचोरा तालुक्याच्या पशुधन विस्तार अधिकारी सुजाता सावंत मॅडम यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनीवर संवाद साधला व गुरांच्या बाजारातून गाय व बैल हटवण्यासाठी सांगितले होते. याची दखल घेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील व इतर कर्मचाऱ्यांना पाठवून पशुधन पालकांना समज देत बाजारात विक्रीसाठी आणलेल्या गायी व बैलांना घरी नेण्यासाठी भाग पाडले होते.

याची दखल घेत आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील व पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. गणेश पाटील यांनी लंम्पी आजाराचा आढावा घेऊन गोवंशाच्या गाय व बैलांचा बाजार सुरु करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. असे असले तरी अजूनही पाचोरा तालुक्यातील गावागावातून लंम्पी आजाराची लागण झालेली गुरे आढळून येत असून दररोज नवीन गुरांना लंम्पी सदृश्य लक्षणे दिसून येत आहेत. ही परिस्थिती पाहून पशुधन विभागाकडून युध्दपातळीवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

असे असले तरी मा. जिल्हाधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यातील लंम्पी आजाराची लागण किती प्रमाणात आहे. त्याची तीव्रता किती प्रमाणात कमी झाली आहे. तसेच कोणत्या भागात आजही लंम्पी बाधित जनावरे आहेत याचा आढावा घेऊनच गाय व बैलांचा बाजार भरवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी सुज्ञ पशुधन पालकांनी केली आहे.