मायबाप सरकार आम्हाला सवलती नको पण गावातील सट्टा, पत्ता जुगार व अवैध दारु विक्री बंद करा, कुऱ्हाड, लोहारा, शिंदाड, पिंपळगाव हरेश्वर येथील महिलांची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०९/२०२३

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुऱ्हाड, शिंदाड, कळमसरा, सातगाव डोंगरी, लोहारा, वरखेडी, अंबे वडगाव, अंबे वडगाव तांडा नंबर एक, अंबे वडगाव तांडा नंबर दोन, कोल्हे विशेष म्हणजे खुद्द ज्या गावात पोलीस स्टेशन आहे अश्या पिंपळगाव हरेश्वर गावात सट्टा, पत्ता, जुगार व अवैध गावठी व देशी दारुची विक्री दिवसाढवळ्या, राजरोसपणे, खुलेआम बिनदिक्कतपणे भरवस्तीत, धार्मकस्थळांजवळ, मराठी शाळा, बसस्थानक परिसरात, हॉटेल, पानटपरी व इतर सार्वजनिक ठिकाणी
चोवीस तास सुरु असल्याकारणाने गावागावात, घराघरात भांडणतंटे, मारामाऱ्या होऊन अशांतता निर्माण झाली असल्याने महिलावर्ग कमालीचा त्रस्त झाला असून “(मायबाप सरकार आम्हाला फुकटात कोणत्याही सवलती नको पण गावागावातील अवैध धंदे बंद करुन आमचे संसार व भावी पिढीला वाचवा अशी आर्त हाक वरील गावागावातून महिलावर्गाने दिली आहे.)”

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुऱ्हाड, शिंदाड, पिंपळगाव हरेश्वर, कळमसरा, लोहारा, वरखेडी, सातगाव डोंगरी, अंबे वडगाव, सावखेडा, लोहारी व अन्य लहानमोठ्या गाव, खेड्यात सट्टा, पत्ता, जुगार तसेच गावठी व देशी दारुची अवैध रीत्या विक्री सह सर्वप्रकारचे अवैध धंदे दिवसाढवळ्या, रात्रंदिवस सुरु असल्याकारणाने गावागावात अशांतता निर्माण झाली असून व्यसनाधीन लोकांच्या घरात दररोज भांडणतंटे होत असल्याने घराघरात अशांतता पसरली आहे. तसेच हे व्यसनाधीन लोक दारु पिऊन भररस्त्यावर धिंगाणा घालत असतात तसेच मनाला पटेल त्या व्यक्तींना शिवीगाळ करणे, दारु पिण्यासाठी दादागिरी करुन पैशांची मागणी करणे, सट्टा, पत्ता, जुगार खेळण्यासाठी व दारु पिण्यासाठी घरातील संसारपयोगी वस्तू व धान्य विकून तसेच एवढ्यावरच न थांबता घरातील महिलांच्या अंगावरील दागदागिने सौभाग्याच लेण मंगळसूत्र मोडून किंवा गहाण ठेवून तसेच शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे विकून व्यसनपूर्ती करत आहेत.

यामुळे घराघरात, गावागावात, गल्लीबोळात भांडणतंटे, मारामाऱ्या होत असल्याने तसेच व्यसनाधीन लोकांच्या घरात खाण्यापिण्याचे वांधे होत असल्याने घराघरात, गावागावात अशांतता पसरली आहे. यातुनच बरीचशी अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. तसेच व्यसनाधीन लोकांच्या घरातील महिलांना मारझोड तसेच गांजपाठ होत असल्याने बऱ्याचशा महिला मुलींनी आपल घर सोडून माहेर गाठल आहे तर बऱ्याचशा महिलांनी आपल्या पती विरोधात पोलीसात किंवा न्यायालयात धाव घेतली आहे.
तसेच भविष्य पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हे अवैध धंदे बंद न झाल्यास गावागावातील महिलावर्गाने व सुज्ञ नागरिकांनी आंदोलन छेडण्याच्या इशारा दिला आहे.
—————————————————————–

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील [कुऱ्हाड, शिंदाड, कळमसरा, सातगाव डोंगरी, लोहारा] या गावातील काही लोक मोठ्या प्रमाणात गावठी दारुची निर्मिती करुन ही तयार झालेली गावठी दारुची ठोक स्वरुपात कॅन चे कॅन भरुन किंवा कॅरी बॅग मध्ये छोट, छोटे पाऊच बनवून कोल्हे, अंबे वडगाव, वरखेडी, अंबे वडगाव तांडा नंबर एक, अंबे वडगाव तांडा नंबर दोन, सावखेडा, लोहारी, कासमपुरा, लोहारी (वैतागवाडी) या गावांना पुरवठा करतात. यामुळे शिंदाड, कळमसरा, कुऱ्हाड, लोहारा, लोहारी या गावातील गावठी दारु निर्मितीचे अड्डे आसपासच्या दहा खेड्यापाड्यातील जनतेसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
——————————————————————
टीप ~ पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुरु असलेल्या अवैध धंद्यांबाबत जनतेच्या तक्रारीची दखल घेऊन वारंवार आवाज उठवला आहे. परंतु अद्याप पावेतो बातमी आली म्हणजे कारवाई केली जाते व नंतर लगेचच त्याच ठिकाणी तेच अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरु होतात. यावरुन असे लक्षात येते की “आम्ही मारल्यासारखे करु तुम्ही रडल्यासारखे करा” असा खेळ खेळुन जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. म्हणून आता ज्या अवैध धंदे करणारांवर वारंवार कारवाई करुनही जर ते जुमानत नसतील तर अशा अवैध धंदे करणारांवर एम. पी. डी. ए. अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

****************************************************************
अवैध धंद्यांबाबत जनमानसातून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जनहितार्थ अवैध धंदे बंद करण्यासाठी वृत्त प्रकाशित करतात परंतु अवैध धंद्याच्या विरोधात वृत्त देणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना संबंधित विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी हे टार्गेट करुन काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना किंवा अवैध धंदे करणारांना हाताशी धरुन संबंधित वृत्त देणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना कसे अडचणीत आणता येईल याकरिता चक्रव्यूह रचतात असाही अनुभव प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना येत आहे. म्हणून वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व कारवाई करण्यात यावी व सर्व प्रकारचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कडक अंमलबजावणी केली जावी अशी मागणी केली जात आहे.
****************************************************************

ब्रेकिंग बातम्या