गावठी डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त न झाल्यास वडगाव आंबे येथील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०९/२०२३
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथे गावात मागील काही वर्षांपासून गावठी डुकरांचा उपद्रव वाढला आहे. या गावठी डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन तसेच वडगाव आंबे ग्रामपंचायतीने संबंधित डुकरांच्या मालकाला वारंवार लेखी व तोंडी सुचना देऊनही संबंधित डुकरांचा मालक जुमानत नसल्याचे आजपर्यंत अनुभवायला येत आहे.
या डुकरांच्या मालकावर कायदेशीर कडक कारवाई करुन गावठी डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला जात नसल्याने यावर्षीही ही गावठी डुकरे मोकाट सुटली असून ही डुकरे गावाच्या सभोवताली असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात घुसून शेतातील कापूस, भुईमूग, मका, उडीद, मूग, चवळी या हिरव्यागार हाती आलेल्या पिकांची नासाडी करत असल्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी हैराण झाला आहे. म्हणून या डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ गुरुवार रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत गावठी डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी संबंधित मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.
या ग्रामसभेतील घेण्यात आलेल्या ठरावानुसार शेंदुर्णी येथील डुकरांचा मालक अंबादास जाधव याला भ्रमणध्वनीवर तसेच घरी निरोप पाठवून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नोटीस बजावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु संबंधित डुकरांचा मालक हा आडदांड वृत्तीचा असल्याकारणाने त्याने ग्रामपंचायतीच्या सुचना व नोटीस कडे दुर्लक्ष केले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा वापरुन धमकावण्याचा प्रयत्न करत आहे.
म्हणून आज दिनांक ११ सप्टेंबर २०२३ सोमवार रोजी वडगाव आंबे येथील शेतकऱ्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रीतसर निवेदन सादर केले असून संबंधित डुकरांच्या मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या गावठी डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त न झाल्यास त्रस्त शेतकरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.