पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला खराब संगणकामुळे कामात अडथळा, सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०२/२०२४
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला जुने व खराब संगणक असल्याकारणाने पोलीस स्टेशनच्या महत्वाच्या कामांमध्ये अडथळा येत असल्याने कार्यालयीन कामकाज तसेच फिर्याद नोंदवून घेणे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल व माहिती पाठवणे अवघड झाले असून वेळेवर कामे होत नसल्याने तक्रारदार नागरिकांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी हतबल झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचा भौगोलिक व पन्नास खेड्यापाड्यातील कायदा सुव्यवस्थेचा विचार केला तर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला मनुष्यबळ अत्यंत तोडके असल्याचे दिसून येते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या कार्यकक्षेत जवळपास पन्नास गावांचा समावेश असून यापैकी काही गावे दूरक्षेत्र लोहारा अंतर्गत येतात या पन्नास गावाचा भौगोलिक विस्तार मोठा असल्याकारणाने पन्नास गावातील लोकसंखेचा विचार केल्यास ही आकडेवारी व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला असलेले मनुष्यबळ अत्यंत तोडके आहे. यातच दररोजच्या दैनंदिन कामासाठी पोलीस स्टेशनमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच कोर्ट, कचेरी, गुन्हाचा तपास, ऐनवेळी उद्भवणारे प्रसंग, अपघात, मारामाऱ्या, सणासुदीचा तसेच धार्मिक उत्सव व महापुरुषांच्या जयंती निमित्त साजरे होणारे कार्यक्रम, मिरवणूका, आठवडे बाजारात अत्यावश्यक बंदोबस्त, रहदारीला शिस्त लावणे तसेच अवैध धंदे बंद करण्यासाठी लागणारी कर्मचारी संख्या तसेच रात्रीच्या वेळी गस्त घालणे साप्ताहिक सुटीवर जाणारे कर्मचारी, वैद्यकीय रजेवर जाणारे कर्मचारी यांची जुळवाजुळव करुन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतांना पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.
यातच भरीत भर पडली असून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अत्यंत जुनाट असे संगणक आहेत. हे संगणक इतके जुने झाले आहेत की या संगणकाचे सी. पी. यू, यू. पी. एस, बॅटरी, कीबोर्ड अत्यंत निकामी झाले असून सॉफ्टवेअर प्रणाली सन २००३ ची जुनीच असल्याने काम करतांना बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणून सॉफ्टवेअर २०१७ ची नवीन सुधारीत प्रणाली कार्यान्वित करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण पोलीस स्टेशनचे सर्वच कामकाज ऑनलाईन व संगणकाव्दारे केले जात आहे. परंतु पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला जुनेच संगणक संच असल्याकारणाने तेथील कर्मचाऱ्यांना तासंतास डोळे फोड करुन कामकाज पुर्ण करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कारण ठराविक कामे वेळेत पूर्ण करुन कागदोपत्री नोंद करणे व अहवाल वरिष्ठांना सादर करणे बंधनकारक असल्याकारणाने जुन्या संगणक प्रणालीमुळे कामात अडथळा निर्माण होत आहे. या जुन्या संगणकांची दुरुस्ती करुन सुध्दा हे संगणक वारंवार नादुरुस्त होतात म्हणून मागील दोन ते तीन वर्षांपासून नवीन संगणक मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही अद्यापही नवीन संगणक मिळत नसल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अश्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे.