सिमेंट रस्त्याव टाकुन मुरमाचा भराव, सांगायला गेल्यावर करतोय डराव, डराव. मोहाडी गावातील अजब प्रकार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०६/२०२३
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथुन जवळच असलेल्या साजगाव गावाजवळ असलेल्या मोहाडी गावात एका ग्रामस्थाने ग्रामपंचायतीने बनवलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर मुरमाचा भराव केल्याने उंचवटा तयार झाला आहे. या उंचवट्यामुळे रहदारीला अडथळा तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला असल्याने भररस्त्यावर पाण्याचे मोठे डबके साचल्याने या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून या डबक्यावर डासांचा प्रादुर्भाव दिसून येत असून डासांची उत्पत्ती वाढत चालली आहे.
तसेच मोहाडी गावात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत चालले असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होत असल्याने गावात दररोज भांडणतंटे होत आहेत. तसेच काही ग्रामस्थांनी मोहाडी गावातील वाढते अतिक्रमण व संबंधित इसमाने भररस्त्यावर टाकलेला मुरुम त्रासदायक ठरत असल्याने ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी संबंधितांना नोटीस देऊन आपापले अतिक्रमण व रस्त्यावर टाकलेला मुरुम काढून घेण्यासाठी लेखी सुचना दिल्या होत्या परंतु संबंधितांनी ग्रामपंचायतीच्या नोटीस व सुचना न जुमानता अतिक्रमण तसेच ठेवले आहे. तसेच ग्रामपचायतीने अतिक्रमण व रस्त्यावर टाकलेला मुरुम काढण्यासाठी प्रयत्न केला असता संबंधित अतिक्रमण धारक व रस्त्यावर मुरुम टाकणारा भिला अमृत नाईक हे शुध्द दादागिरीची भाषा करत हमरीतुमरीवर येतात असे खात्रीलायक वृत्त आहे.
म्हणून मोहाडी गावातील अतिक्रमण व भिला अमृत नाईक यांनी रस्त्यावर टाकलेला मुरुम काढण्यासाठी ग्रामपचायतीने ठराव केला आहे. व ही कारवाई करतांना भांडणतंटे होऊ नये म्हणून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रीतसर अर्ज देऊन पोलीस बंदोबस्त मागीतला आहे. मात्र अद्याप पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने मोहाडी गावातील अतिक्रमण व रस्त्यावर टाकलेला मुरुम तसाच असल्याने या कारणांमुळे गावात दररोज भांडणतंटे होत आहेत. या कारणांमुळे गावात भांडणतंटे होऊन गावातील शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी लवकरात, लवकर पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.