पाचोरा नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी गटारीत, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०२/२०२२
एकिकडे पाचोरा शहरातील नागरिकांना दैनंदिन वापराच्या व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असतांनाच दुसरीकडे मात्र जारगाव शिवारातुन येणारी व पाचोरा शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटून नगरपालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे दररोज लाखो लिटर पाणी गटारीत वाहून जात आहे. म्हणून नगरपालिकेच्या लाखो लिटर पाण्याच्या नासाडीला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल कॉंग्रेस उपस्थित केला असून या गलथान कारभाराबाबत आंदोलन छेडणार असल्याचे समजते.
या बाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी, कृष्णापुरी भागात पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी ही जारगांव शिवारातुन येते ही जलवाहिनी मागील काही दिवसापासून हायवे रस्त्यालगत फुटली असल्याने या पाईपलाईन सिंधी कॉलनीच्या जलकुंभाला भरण्यासाठी जेव्हा पाणी पुरवठा सुरु होतो तेव्हा फुटलेल्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होऊन हे पाणी थेट जारगांवातील नुराणी नगर परीसरातील नागरिकांनाच्या दुकानात आणि घरात पोहचत आहे. पुढे या पिण्यालायक शुद्ध पाण्याचे गटारीत रुपांतर होऊन हे पाणी थेट हिवरा नदिच्या पात्रात वाया जात आहे.
या होणाऱ्या पाणी गळतीची व पाणी गळतीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत नागरिकांनी पाचोरा नगरपालिकेकडे तक्रार केली. मात्र ही तक्रार केल्यानंतर मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करुन पाणी गळती थांबवणे गरजेचे असतांनाच नगरपालिकेने तसे न करताच पाणी गळतीच्या ठिकाणी भलामोठा विस फुटाचा खड्डा करुन काम अर्धवट सोडून दिल्याने या ठिकाणी एकप्रकारे जलाशयाचे स्वरुप निर्माण झाले आहे. म्हणून या खड्डारुपी जलाशयात लहान मुलांना तसेच या परिसरातून जाणाऱ्या, येणाऱ्या वाटसरुंच्या जीवितास धोखा निर्माण झाला आहे.
तक्रार करुनही पाचोरा नगरपालिका काहीच उपाययोजना करत नसल्याने सरतेशेवटी वैतागलेल्या ग्रामस्थांनी पाचोरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा.श्री. सचिन सोमवंशी यांच्या कडे धाव घेत संबंधित समस्या त्यांच्या समोर मांडली. समस्या समजताच मा. श्री. सोमवंशी यांनी सदर ठिकाणी जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी थेट ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी या परिसरातील ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच सविस्तर पाहणी केली असता सर्वात धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे पाणी पुरवठा बंद झाल्यावर खड्डय़ातील माती युक्त घाण पाणी सरळ पुन्हा पाईपलाईन मध्ये जाते आणि तेच पाणी पुढे नवीन पाणी पुरवठा सुरू केल्यावर सिंधी कॉलनीच्या जलकुंभात हे पाणी जात आहे. या पाईपलाईन फुटलेल्या जागेवर दोन विद्युत पुरवठा चे पोल आहेत ते कधीही खाली कोसळतील अशी परिस्थिती झाली आहे.
येत्या दोन दिवसात पाचोरा नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन फुटलेली पाईप लाईन जोडावी अन्यथा कॉंग्रेस आंदोलन करेल असा इशारा मा.श्री. सचिन सोमवंशी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.