सोयगावच्या विरप्पनचा पाचोरा तालुक्यात धिंगाणा, वनविमागाच्या अधिकाऱ्यांची अर्थपूर्ण डोळेझाक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०४/२०२२
(पाचोरा तालुक्यातील भोजे येथील लाकडाची वखार व कटाई मशीन याची रितसर परवानगी आहे किंवा नाही याबाबत वखार मालक किंवा स्थानिक ग्रामसेवक, तलाठी तसेच वनविभाग कोणतीही सविस्तर माहिती देत नसल्याने या वखारीबाबत लवकरच माहितीच्या अधिकारात माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवण्यात येईल. कारण ही लाकूड वखार व कटाई मशीन हे भर वस्तीत असून या वखारीवर रात्रंदिवस लाकुड कटाई केली जात आहे. या लाकुड कटाई मशीनच्या सततच्या आवाजाने आसपासच्या ग्रामस्थांना विशेष करुन जेष्ठ नागरिक, व्याधी पिडीत रुग्ण यांना शात झोप घेता येत नाही. तसेच शालेय विद्यार्थ्यांना आभ्यास करतांना या आवाजाने त्रास होतो अश्या तक्रारी बऱ्याच वर्षापासून आहेत. मात्र कायदा आमच्या बापाचाच आहे असे समजणारा वखार मालक व या वखार मालकाकडून मलिदा खाऊन कुंभकर्ण झोपेचे सोंग घेणारा वनविभाग व संबंधित जबाबदार अधिकारी यांच्या आशिर्वादाने हे सगळे सुरु असल्याचे बोलले जात आहे.)
पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वृक्षतोड तोड सुरु असून हिरवीगार वनराई झपाट्याने नष्ट होत आहे. एका बाजूला निसर्ग संपत्तीचे जतन करण्यासाठी शासन दरवर्षी कोटीने रुपये खर्च करत असतांनाच दुसरीकडे मात्र विरप्पनची पिल्लावळ व वनविभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून यात मोठमोठे, डेरेदार हिरवेगार वृक्ष दिवसाढवळ्या स्वयंचलित यंत्राच्या साह्याने काही मिनिटात जमिनदोस्त होतांना दिसत आहेत.
पाचोरा तालुक्यातील काही लाकुड व्यापारी व सोयगाव तालुक्यातील मुस्तफा आजच्या घडीला (विरप्पन) म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण हा मुस्तफा लाकडाचा व्यापारी व त्याच्या इतर तीन भावांनी सोयगाव तालुक्यातील निंबायती, बहूलखेडा, कौली व पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा, वाडी, शेवाळे, पिंपळगाव हरेश्वर, भोजे, चिंचपूरे, वरखेडी, सावखेडा, लासुरे, अंबे वडगाव, शिंदाड, राजूरी, कोल्हे, अटलगव्हान व इतर आसपासच्या गावपरिसरातील व शेती शिवारातील शेतातील झाडे विकत घेऊन तर काही शासकीय जागेवरील व नदी, नाल्यांच्या काठावरील हिरवीगार वृक्षांची कत्तल करुन हे लाकुड ट्रकमध्ये भरुन ताडपत्रीने झाकुन औरंगाबाद, गुजरात, मध्यप्रदशाकडे रवाना करत आहे.
तसेच पाचोरा तालुक्यातील भोजे येथे एक लाकुड वखार असून ही लाकुड वखार ग्रामीण भागात व अडगळीच्या ठिकाणी असल्याकारणाने या वखारीवर लाकुड विकणे विकणे सोयीचे आहे. म्हणून या वखारीवर सोयगाव, पाचोरा, जामनेर, भडगाव तालुक्यातील लाकुड व्यापारी रात्रीच्यावेळी चोरट्या शेत रस्त्यावरुन लाकडाने भरलेले ट्रक्टर आणून या वखारीवर विकत आहेत. या वृक्षतोडीबाबत पाचोरा वनविभागात वारंवार तक्रारी करुन सुध्दा काहीच फायदा तर होत नाहीच उलट वनविभागाकडून तक्रारदारांना वेठीस धरले जाते व त्रास दिला जातो असेही अनुभव निसर्गप्रेमींना येत आहेत.
म्हणून या परिसरात झालेल्या वृक्षतोडीची व भोजे, लोहारा, शेंदुर्णी येथील लाकुड वखारीवर पडलेल्या तसेच या लाकुड व्यापाऱ्यांनी व वखार मालकांनी जंगलात साठवणूक करुन लपवून ठेवलेल्या लाकूड साठ्याची सखोल चौकशी करुन हे लाकुड जप्त करण्यात यावे व सबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिक व निसर्गप्रेमींनी केली आहे.
कारण माणसाच्या गरजा वाढत आहेत असे म्हणण्यापेक्षा लोकसंख्या वाढीमुळे एक स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा स्पर्धेत फक्त स्वार्थ साधला जातो. एका बाजूला निसर्गाचा आणि पर्यावरणाचा कोणीही विचार करतांंना दिसून येत नाही. तर दुसरीकडे जेवढ्या औद्योगिक संस्था, शिक्षण संस्था, महामार्ग, घरे, इमारती, या मागील तीन दशकांत निर्माण झाल्या तेवढ्या यापूर्वी कधीही झाल्या नव्हत्या. त्या सर्वांसाठी लाकडाचा वापर हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे झालाच किंवा अडसर ठरणारी वनराई काढण्यात आल्यामुळे साहजिकच त्यामुळे बेसुमार वृक्षतोड करण्यात आली.
झाडांचा आणि निसर्गाचा संबंध खूप जवळचा आहे. पृथ्वीवर जगण्यासाठी लागणारी हवा आणि पाणी हे झाडांवर अवलंबून आहे. जलचक्र पूर्ण होण्यासाठी जमिनीवर पाऊस पडावा लागतो. पाऊस पडण्यासाठी थंड आणि पर्यावरणयुक्त असा भूभाग आवश्यक असतो. त्यासाठी सदाहरित वृक्षांची गरज भासते. जेवढी वृक्षसंख्या जास्त तेवढा पाऊस जास्त पडतो हे माहिती असल्यावरही आपणच झाडे तोडत असल्यान पाऊसाचे प्रमाण कमी झालेच आहे सोबतच वातावरणात झपाट्याने बदल होत असून हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असून ओझोन वायूचा स्थर झपाट्याने कमी होत चालला आहे.
झाडे देखील श्वसन क्रिया करत असतात ज्यामध्ये ऑक्सिजन बाहेर सोडून कार्बन डायऑक्साइड आत घेतात. माणसासाठी आणि इतर सजीवांना ऑक्सिजन आवश्यक असतो. तसेच सर्व सजीव कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात. म्हणजेच झाडे आणि सजीव हे एकमेकांना प्राण प्रदान करतात असे म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही. तसेच गाड्यांमधून आणि कारखान्यांमधून बाहेर पडणारे विषारी वायू हे देखील झाडेच शोषून घेतात.
म्हणून अशीच वृक्षतोड जर होत राहिला तर आपण आपलेच नुकसान करवून घेत आहोत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे परिसरात झाडे नसल्याने उष्णता वाढत आहे. मानवी त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी ही उष्णता काही हितावह नाही. तसेच वायू प्रदूषणही झाल्याने होत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. वृक्षतोड थांबवून परिसरात जर झाडांची संख्या वाढवली तर माणसाचे आरोग्य सुधारेल आणि दुष्काळ कधी येणार नाही.
कारण झाडे आपली मुळे जमिनीत खोलवर नेतात. त्यांना पाण्याची गरज भासते. पाऊस पडल्यावर जमिनीत मुरणारे पाणी झाडांची मुळे आपोआप शोषून घेतात. त्यामुळे झाडांची वाढ होते. जमिनीचा कस नियंत्रित राखला जातो. मातीची धूप होत नाही. पण जर वृक्षतोड झाली तर मातीची धूप होऊन जमिनीचा कस संपुष्टात येईल. पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही. प्राणी आणि पक्षी जीवन संपुष्टात येईल हे गणित सगळ्यांना माहिती असल्यावरही आपण थोड्याफार पैशासाठी हिरवीगार वनराई नष्ट करत आहोत.
काही वर्षांपूर्वी मनुष्यबळाचा वापर करुन झाडे कापली जात होती. तसेच गावचे तलाठी, वनविमागाचे अधिकारी, कर्मचारी कर्तव्यदक्ष होते म्हणून झाडे कापणे खुप कठीण होते. परंतु आता माणसाकडे विकासाच्या नावाखाली अनेक यंत्रे आहेत ज्याद्वारे कित्येक वर्षे जगलेला वृक्षकाही क्षणातच नेस्तनाबूत केले जात आहेत. या झपाटय़ाने होणाऱ्या वृक्षतोडीने जंगलच्या जंगल नष्ट होत असल्याने जंगलातील प्राणी आणि पक्षी स्थलांतर करत आहेत. स्थलांतर करुनही सगळीकडे वृक्षतोड होत असल्याने त्यांची अन्नपाण्यासोबतच घरटी नाहीसी होत असल्याने उत्पत्ती थांबली आहे. या कारणांमुळे सर्वच्या सर्व वन्यजीवांचे जीवन विस्कळीत होत आहे.
एखादी नदी असेल, तिच्या शेजारील वृक्ष जर तोडले तर ती नदी उन्हाळ्यात सुकून जाते. निसर्गचक्रात एक मोठा अडथळा वृक्षतोडीमुळे निर्माण झालेला आहे. पृथ्वीवर अचानक तापमान खूपच वाढले आहे. वाढत्या तापमानामुळे आणि प्रदूषणामुळे ओझोनचा थर लोप पावत आहे. अशा एक ना अनेक समस्या फक्त वृक्षतोडीशी निगडित असल्यावरही आपण वृक्षतोड थांबवत नाही ही आजच्या परिस्थितीत स्वताला प्रगत व समजदार म्हणून घेणाऱ्या मानव जातीसाठी शरमेची बाब आहे.