पत्रकारिता क्षेत्रातील लेखणीचा शिलेदार अनिल केऱ्हाळे अनंतात विलीन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०५/२०२३
जळगावातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेला लेखनीचा शिलेदार टी. व्ही. नाईन चे पत्रकार अनिल दत्तात्रय केऱ्हाळे (वय वर्षे ५०) यांचे यांचे आज दिनांक ०९ मे २०२३ मंगळवार रोजी मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असतांनाच दुखद निधन झाले. त्यांच्यावर मागील पंधरा दिवसांपासून मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सायंकाळी पाच वाजता त्यांचे पार्थिव जळगाव येथे दाखल होणार आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, तीन बहिणी, दोन भाऊ असा परिवार आहे.
स्व. अनिल केऱ्हाळे यांच्या पत्रकारितेची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असतांनाच शैक्षणीक जीवनापासून झाली होती. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असतांना अनेक आंदोलनात सहभाग घेतला होता. तसेच वनवासी कल्याण आश्रमाचे काम त्यांनी पाहिले तसेच गेल्या पंचवीस वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी राजकीय व सामाजिक विषयांवर वृत संकलन करुन अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराविरुद्ध सतत आवाज उठवून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न केले.
अनिल केऱ्हाळे हे मनमिळाऊ व शांत स्वभावाचे होते. त्यांच्या अचानकपणे जाण्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह टी. व्ही. नाईन मराठी परिवार हळहळला आहे.