मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश येईपर्यंत गुरांचा बाजार बंदच, पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचा कडक बंदोबस्त.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/११/२०२२
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील पाचोरा व भडगाव तालुक्यात व दर गुरवारी वरखेडी तसेच दर सोमवारी नगरदेवळा येथे भरणारे गुरांचे बाजार जिल्हाधिकारी यांच्या दिनांक ६ सप्टेंबर २०२२ मंगळवार रोजीच्या आदेशानुसार लम्पी स्किन डीसीज या साथ रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये आढळून आल्याने बंदच करण्यात आलेले आहेत.
गुरांचे बाजार बंदचे आदेश असतांनाही मागील आठवड्यात दिनांक १० नोव्हेंबर २०२२ गुरुवार रोजी वरखेडी येथील गुरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात म्हशी व गोधन विक्रीसाठी आले होते. ही माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे साहेब यांनी पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. पवार साहेब व सहकाऱ्यांना पाठवून म्हशी व गोधन घेऊन गुरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या पशुधन पालकांना व व्यापाऱ्यांना समजून सांगत परत पाठवले होते.
असे असले तरी गावागावातून काही व्यापारी व पशुधन पालकांनी येत्या १७ नोव्हेंबर २०२२ रोजी गुरांचा बाजार भरणार असल्याची खोटी अफवा पसरवून गुरांचा बाजार भरवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ही बाब माहीत पडताच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांनी दिनांक ०६ सप्टेंबर २०२२ मंगळवार रोजीच्या आदेशाचा पुरावा देत वरखेडी येथील गुरांचा बाजार बंदच असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना देऊन वरखेडी गुरांच्या बाजारात किंवा बाजाराजवळ गुरे विक्री साठी आणू नये असे आवाहन केले होते.
म्हणून मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची व पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांच्या सुचनेची दखल घेऊन पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे साहेब यांनी आज दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ गुरुवार रोजी सकाळपासूनच आपले कर्मचारी पाठवून बाजारात विक्री साठी आलेल्या म्हशी व गोधन पालक व व्यापाऱ्यांना परत पाठवले व गुरांचा बाजार बंद ठेवण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सुचना ~ वरखेडी येथील गुरांच्या बाजारासमोर किंवा आसपासच्या परिसरात कुणीही गुरे जमवून खरेदी, विक्री करण्यासाठीचा प्रयत्न करु नये जेणेकरून पाचोरा, जामनेर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होईल तसेच मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल याची पशुधन पालक व व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी.
(वरखेडी येथील गुरांचा बाजार सुरु करावा पशुधन पालकांची मागणी.)
जळगाव जिल्ह्यातील बऱ्याचशा बाजास समितीच्या बाजारात गुरा, ढोरांचे बाजार सुरु झाले आहेत. तसेच पाचोरा तालुक्यातील लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे वरखेडी येथील गुरांच्या बाजारासाठी परवानगी द्यावी अशी मागणी पशुधन पालक व व्यापाऱ्यांनी केली आहे.