करमुड येथील कापूस व्यापाऱ्याला मापात पाप करतांना रंगेहाथ पकडले परंतु जागेवर तोडी, पाणी करून लगेचच सोडले.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०२/२०२३
आपला जिल्हा कापूस उत्पादनात आघाडीवर असला तरी यावर्षी शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभाव, शासकीय खरेदी व इतर उपाययोजना न केल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटासह अनेक अडचणीत सापडला आहे. एका बाजूला याचाच फायदा घेत खाजगी कापूस व्यापाऱ्यांनी ही नामी संधी उचलून कापसाची खरेदी सुरु केले आहे. तर दुसरीकडे दैनंदिन व्यवहारात पूर्ण करण्यासाठी कापूस विकल्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी खाजगी कापूस व्यापाऱ्यांना कापूस विकत आहेत. याचाच फायदा घेत काही कापूस व्यापारी हात काटा म्हणजे (ताण काट) स्प्रिंग काट्यावर तर काही कापूस व्यापारी धडी काट्यावर कापूस मोजून घेत आपला व्यवसाय सुरु केला आहे.
परंतु पाचोरा तालुक्यासह, चाळीसगाव तालुक्यातील करमुड येथील बऱ्याचसे व्यापारी स्वताचे वाहन घेऊन तर काही स्थानिक व्यापाऱ्यांनी ताण काट्यावर व धडी काट्यावर कापूस मोजून घेतांना जास्त पैसा कमावण्यासाठी या ताण काट्यात हेराफेरी करत ताण काट्यातील स्प्रिंग तारेने बांधून तर काहींनी काट्यातील मापदर्शक पट्टी वाकवून व हात सफाई करत कमी वजनात जास्त कापूस मोजून घेण्यासाठी सपाटा लावला आहे.
तर काही कापूस व्यापारी धडी काट्यावर कापूस मोजून घेतांना हातसफाई करत तर कधी कापसाने भरलेल्या चवाळ्याला खालून गुढग्याचा टेकू लाऊन तसेच घडी काट्यात हेराफेरी करुन वीस किलो वजनाचे मापाला आतल्या बाजूने जास्तीचे लोखंड भरुन एक वीस किलोच्या मापामध्ये दोन किलो जास्त वजनाचे अप्रमाणित वजन तयार करत ते वापरुन मापात पाप करत शेतकऱ्यांची लुटत आहेत. असाच कापूस व्यापाऱ्यांच्या गोरखधंद्याचा आज रोजी पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी येथील शेतकऱ्यांनी भांडाफोड केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की चाळीसगाव तालुक्यातील करमुड येथील एका कापूस व्यापाऱ्याने मागील महिन्यापासून वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावात कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. ही कापूस खरेदी करतांना एका स्थानिक व्यक्तीला हाताशी धरुन त्याला योग्य तो मोबदला देण्याच्या बोलीवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबत संधान साधून कापूस खरेदीचा सपाटा लावला आहे. गावातीलच भरवश्याची व्यक्त या राजमाने येथील कापूस व्यापाऱ्यासोबत असल्याकारणाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी या कापूस व्यापाऱ्याला आपला कापूस विकत होते.
परंतु आज दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ बुधवार रोजी करमुड येथील कापूस व्यापारी नियमितपणे कापूस विकत घेण्यासाठी आला असता याला काही शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला म्हणून कापूस मोजून घेण्यासाठी सुरुवात झाली कापूस मोजून घेतांना काही शेतकऱ्यांच्या घरात मोजून भरलेल्या कापसाचे वजन व व्यापाऱ्यांने मोजून घेतलेल्या कापसाचे वजन यात कमालीची तफावत जाणवल्यावर शेतकऱ्यांनी काही एक न बोलता वजन माप करतांना बारकाईने निरीक्षण केले असता संबंधित कापूस व्यापाऱ्याचा मापाडी हातसफाई करत वजनापेक्षा जास्तीत, जास्त कापूस मोजून घेतांना दिसून आल्यानंतर सर्व कापूस विक्रेत्या शेतकऱ्यांनी संबंधित कापूस व्यापाऱ्याला धारेवर धरले व गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या.
परंतु शेतकऱ्यांच्या रोष व आपल्यावर गुन्हा दाखल होईल या भितीमुळे संबंधित कापूस व्यापाऱ्याने आपली चूक कबूल करत माफी मागितली व कापूस मोजून घेतांना वजनात केलेल्या हेराफेरीत जास्तीचा मोजून घेतलेल्या कापसाचे पैसे देण्याचे कबूल केले व ते पैसे लगेचच दिल्याने या लबाड व्यापाऱ्याच्या पापावर पांघरुण घातले असले तरी या राजमाने येथील व्यापाऱ्याने आजपर्यंत पाचोरा तालुक्यातील गावागावात बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करुन आजपर्यंत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. म्हणून अश्या बाहेरगावाहून येणाऱ्या व पन्नास ते शंभर रुपये जास्त भाव देऊन मापात पाप करुन शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणीही कापूस देऊ नये किंवा कापूस मोजून देण्याआधी वजनकाटा तपासून घ्यावा व मोजमाप करतांना बारकाईने लक्ष ठेवून कापूस मोजून द्यावा अशी सूचना सुज्ञ नागरिकांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केली आहे.
वापाऱ्याने गावाचे नाव सांगितले खोटे ~
संबंधित कापूस व्यापाऱ्याची लबाडी उघड झाल्यानंतर त्याने स्वताची खरी ओळख लढवण्यासाठी मी राजमाने गावचा असल्याचे सांगितले होते. परंतु अधिक माहिती जाणून घेतली असता फोटोतील कापूस व्यापारी हा राजमाने येथील नसून तो चाळीसगाव तालुक्यातील करमुड येथील असल्याचे समोर आले आहे.