मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, वरखेडी येथे अनधिकृतपणे गाय व बैलांचा भरला बाजार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०९/२०२३
राज्यात गेल्या पाच महिन्यांपासून गोवंशाच्या गाय, वासरु व बैलांना लंम्पी स्कीन (चर्मरोगाच्या) आजाराची झपाट्याने लागण झाली असल्याने मिळालेल्या माहितीनुसार आजपर्यंत राज्यात मागील १५ दिवसात ४२७८४ च्या जवळपास जनावरांना लागण झाली असून ९७३ जनावरे दगावली असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आकडेवारीत पुन्हा भर पडली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याची दखल घेत ज्या, ज्या तालुक्यात लंम्पी आजाराची लागण झाली आहे त्या, त्या तालुक्यातील भरणाऱ्या गुरांच्या बाजारावर बंदी घातली होती. परंतु हा आजार फक्त गोवंशाच्या जनावरांमध्ये आढळून आल्याने तदनंतर निर्णय बदलवून गोवंशीय जानावरे वगळता म्हैस, बकरी, कोंबडी व इतर पाळीव प्राण्यांचा बाजार भरवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
तसेच जिल्हाधिकारी मा. श्री. आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये वरखेडी गुरांच्या बाजारात गोवंशाच्या जातीच्या जनावरांच्या खरेदी, विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. याची दखल घेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. गणेश पाटील यांनी एक पत्रक काढून तसेच पोस्टर लाऊन वरखेडी गुरांच्या बाजारात कुणीही गाय, वासरे व बैल विक्रीसाठी आणू नये असे आवाहन केले होते. यामुळे वरखेडी गुरांच्या बाजारात गोवंशाच्या गुराढोरांना मार्केट यार्डात परवानगी नाकारण्यात आली होती.
परंतु या आदेशाला न जुमानता काही गुरांच्या व्यापाऱ्यांनी व पशुधन पालकांनी मनमानी कारभार करत वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी ग्रामपंचायत हद्दीतील कुऱ्हाड रस्त्यालगत असलेल्या नवीन हायटेक सी. टी. या परिसरातील मोकळ्या जागेत गाय, बैल व वासरांचा बाजार भरवला होता. याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता बरेचसे बैल व गायींना लसीकरण करण्यात आले नसल्याचे दिसून आले तसेच दोन ते तीन बैलांना लंम्पी आजाराची लागण झाली होती असे बैल या ठिकाणी विक्रीसाठी आणण्यात आले होते अशी माहिती समोर येत आहे.
वरखेडी येथे अनधिकृतपणे गुरांचा बाजार भरवण्यात आल्याने पशुधन पालकांनी नाराजी व्यक्त करत या अनधिकृतपणे भरवण्यात आलेल्या बाजारातून लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. कारण लंम्पी आजाराला आळा घालण्यासाठी एकाबाजूला पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांना लंम्पी प्रतिबंधक लसीकरण युध्दपातळीवर करण्यासाठी कडक आदेश दिले आहेत. या आदेशानुसार पशुसंवर्धन विभागामार्फत गावागावात तसेच शेत शिवारात जाऊन लसीकरण मोहीम युध्दपातळीवर सुरु आहे.
मात्र दुसरीकडे काही गुराढोरांचे व्यापाऱ्यांनी काही दलालांना हाताशी धरुन गावोगावी पाठवून तसेच भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी ग्रामपंचायत हद्दीतील कुऱ्हाड रस्त्यावर असलेल्या हायटेक सी. टी. च्या मोकळ्या जागेत अनधिकृतपणे गुरांचा बाजार भरवला होता. या बाजाराकडे भोकरी ग्रामपंचायत व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या मार्फत कायदेशीर कारवाई होणे गरजेचे होते. मात्र याकडे जबाबदार घटकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन तर्फे या अनाधिकृत भरवण्यात आलेल्या बैल बाजारात काही पोलीसांची उपस्थिती होती मात्र संबंधित पोलीसांनी बैलांच्या व्यापाऱ्यांवर कारवाई का केली नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे. हा प्रकार असाच सुरु राहिला तर भविष्यात भीषण समस्यांना सामोरे जावे लागेल असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.