जगा आणि जगू द्या विकास मंचचे आंदोलन आठव्या दिवशी मागे.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०२/२०२३
जगा-जगू द्या विकास मंचतर्फे तालुक्यातील विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाची दखल घेत पाचोरा तहसीलदार मा. श्री. कैलासजी चावडे साहेब यांनी आठव्या दिवशी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा घडवून आणली व संबंधित विविध मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाला येत्या १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर जगा आणि जगू द्या विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन मागे घेतले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जगा आणि जगू द्या विकास मंचतर्फे २५ जानेवारीपासून विविध मागण्यांसाठी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. तहसीलदार कैलास चावडे यांनी आंदोलनकर्त्यांसह संबंधित अधिकाऱ्यांची तहसिल कार्यालयात बैठक घेतली. यात प्रामुख्याने २०२२ मध्ये पाचोरा तालुक्यातील वाडी – शेवाळे या गावातीलच कापूस व्यापाऱ्याने गोरगरीब शेतकऱ्यांचा कापूस घेऊन एकूण ८४ लाखात फसविले व ११ फेब्रुवारी होता २०२२ पासून परिवारासह फरार झाला. गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे घामाचे पैसे मिळावेत म्हणून मागणी करण्यात आली तसेच हायवे रस्त्याचे काम, रेल्वे भुयारी मार्ग, भूमिगत गटारी, घरकुल, संजय गांधी निराधार योजना, बाजार समिती जमीन व्यवहार, बांधकामसह १७ मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी नायब तहसिलदार संभाजी पाटील मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, सहाय्यक दुय्यम निबंधक सूर्यवंशी, महावितरणचे शिरसाठ, कृषी उत्पन्न बाजार समिती, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी सह आंदोलनकर्ते नीलकंठ पाटील, गुलाबराव पाटील, भूषण वानखेडे आदींचा समावेश होता.