कुऱ्हाड बसस्थानक परिसरात जीवघेणे अतिक्रमण व अवैध धंद्यांचा कहर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०२/२०२३

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड हे मोठ्या लोकसंखेचे गाव असल्याने चांगल्या प्रकारे बाजारपेठ आहे. तसेच येथे आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी आठवडे बाजार भरत असल्याने या बाजारात तसेच दररोज जवळच असलेल्या म्हसास, सार्व, जामनेर, कुऱ्हाड बुद्रुक, सांगवी येथील नागरिक व गावकरी दैनंदिन कामकाजासाठी येतात तसेच याच गावातील शाळा, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी कुऱ्हाड येथुनच एस. टी. तुन प्रवास करत असल्याने बसस्थानक परिसरात रात्रंदिवस वर्दळ असते. यामुळे या बसस्थानक परिसरात एस. टी. बस आल्यावर वाहक व चालक यांना तारेवरची कसरत करत आपले वाहन न्यावे लागते तसेच बस वळवतांन त्यांना अडचणी येतात तेव्हा हे अतिक्रमण धारक त्यांच्यावर दादागिरी करून हुज्जत घालतांना दिसून येतात अशीही माहिती समोर येत आहे.

परंतु याच बसस्थानक परिसरात काही व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायाची दुकाने लावली असून ही दुकाने रहदारीला अडथळा निर्माण होईल अश्या पध्दतीने भररस्त्यावर मांडली आहेत. यामुळे व्यवसायिकांनी मांडलेल्या टपऱ्या व टपरीवजा दुकानांमुळे मोठ्या प्रमाणात रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे काही अतिक्रमण धारकांनी कहरच केला असून प्रवासी निवाऱ्यावर (बसस्थानक) ताबा मिळवत आपल्या व्यवसायाची दुकाने लावली असल्याने कुऱ्हाड येथुन शाळा, कॉलेजमध्ये जाणारे शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी सोबतच एस. टी. च्या प्रवाशांची गैरसोय होत असून विद्यार्थीनींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याच गजबजलेल्या बसस्थानक परिसरात सट्टा, जुगार, गावठी दारू, देशी दारुची खुलेआम विक्री केली जात असल्याने या परिसरात सटोडे, जुगारी, बेवडे हे धुमाकूळ घालत असतात म्हणून मागील काही वर्षांपासून कुऱ्हाड गावातील काही सुज्ञ नागरिकांनी व ग्रामपंचायतीने सगळ्या प्रकारचे अवैध धंदे बंद होण्यासाठी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला व वरिष्ठांना निवेदन देऊन अवैध करणारांना पायबंद घालण्यासाठी मागणी केली आहे. परंतु अद्यापही या अवैध धंदे करणारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होत नसल्याने महिलावर्ग आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. म्हणून आतातरी ग्रामपंचायत, भुमी अभिलेख व पोलीस प्रशासनाने बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी संयुक्तपणे मोहीम राबवून कुऱ्हाड गावातील व बसस्थानक परिसरातील सुरु असलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली जात आहे.

(पुढच्या भागात “अतिक्रमण धारक व अवैध धंदे करणारांची दादागिरी, गावातील काही शुक्राचार्यांची अवैध धंदे करणारांची हुजरेगिरी”)

ब्रेकिंग बातम्या