रानडुक्कर घरात, वनविभागाचे अधिकारी दारात, कळमसरा व लोहारा येथून तीन संशयितांना अटक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०६/२०२२
पाचोरा तालुक्यात कार्यरत असलेले वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे नावालाच उरले असल्याचा अनुभव पदोपदी येत आहे. कारण मागिल चार महिन्यांपासून पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असुन सुद्धा व निसर्गप्रेमींनी वारंवार तक्रारी करुन तसेच प्रसारमाध्यमांनी वृक्षतोड थांबवण्यासाठी सतत आवाज उठवून सुध्दा विरप्पनच्या पिल्लावळीने दिवसाढवळ्या हिरव्यागार वृक्षांची मोठ्या कत्तल केली. तसेच याबाबत पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधींनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याने आमचे कुणीही काहीच करु शकत नाही अशी मानसिकता निर्माण झाली आहे.
म्हणून की काय आता पाचोरा तालुक्यातील राखीव जंगलात हरणाची व इतर प्राण्यांची शिकार करणारी एक टोळी सक्रिय झाली आहे. याबाबत जनमानसातून मिळालेल्या माहितीनुसार सत्यजित न्यूज ने
(पाचोरा व जामनेर तालुक्यातील राखीव जंगलात हरणाची शिकार, वनमजूरासह कायद्याचा रक्षक सहभागी.) या मथळ्याखाली दिनांक २० जून सोमवार रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. तरीही पाचोरा वनविभागातील गेंड्याच्या कातडीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. किंवा साधी चौकशीही केली नसल्याने व या शिकाऱ्यांसोबत वनविभागातील एक वनमजूर सामिल असल्याने या शिकार करणारांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे.
याचेच जिवंत उदाहरण म्हणजे दिनांक २२ जून २०२२ बुधवार रोजी सायंकाळी वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. याच धामधूमीत लोहारा, कळमसरा परिसरातील जंगलात काही शिकारी शिकार करण्यासाठी गेले होते. या शिकाऱ्यांच्या हाती हरणा ऐवजी रानडुक्कर लागले व त्यांनी त्या रानडकराला शिताफीने फास्यात अडकवून जेरबंद केले. या डुकराला जेरबंद करुन चक्क लोहारा येथून जवळच असलेल्या कळमसरा गावातील हनुमान मंदिर परिसरातील खळवडी भागात नव्यानेच पाडण्यात आलेल्या प्लॉट परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये त्याला सगळ्यांच्या नजरा चुकवत डांबून ठेवण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजला प्राप्त झाले होते.
ही माहिती मिळताच सत्यजित न्यूज ने पाचोरा वनविभागाचे अधिकारी फोन घेत नसल्याने व कोणतीही ठोस कारवाई करत न करता मिलीभगत करत असल्याने त्यांना अनभिज्ञ ठेवून त्वरित जळगाव येथील वनविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सदरची घटना कळवली त्यांनी लगेचच दखल घेत सत्यता पडताळून घेण्यासाठी व तसे काही आढळून आल्यास आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून रानडुक्कर व संबंधित इसमावर कारवाई करण्यासाठी आदेश दिले होते.
वरिष्ठांच्या आदेशानुसार वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिनांक २२ जून बुधवार रात्री कळमसरा गावातील हनुमान मंदिराजवळील नवीन प्लॉट परिसरातील एका इसमाच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये रानडुक्कर आढळून आल्याने संबंधितास रानडुकरासह अटक करुन ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत् आहे.
तसेच त्यांनी संबंधित संशयितिकडे अधिक विचारपूस केली असता त्याने लोहाच्या येथील दोन इसमांची नावे सांगितली असता वनविभागाकडून त्या दोघ संशयितांना ही ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. (परंतु संबंधित शिकारी व यात सामील असलेल्या आरोपींना सोडवण्यासाठी त्यांचे हितचिंतक जिल्हा नव्हे तर थेट मुंबई पर्यंत फोन करून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत) मात्र संबंधितांचे भ्रमणध्वनी हे कव्हरेजक् क्षेत्राचे बाहेर असल्याने संबंधितांवर डोके धरून बसण्याची वेळ आली आहे.
महत्वाचे~
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास या अगोदर झालेल्या शिकारीचा व शिकार करणारांचा तपास केल्यानंतर हरणाची शिकार झाल्याचा प्रकार उघडकीस येण्यास उशीर लागणार नाही. व अशी थेट कारवाई झाल्यास सत्यजित न्यूज संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन सन्मानित करेल असे आम्ही जाहीर करतो.