प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या व्यक्तीगत मान्यता रद्द करण्यात याव्यात. किशोर गरुड यांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास मंडळ संचलित खाजगी प्राथमिक विद्यामंदिर पिंपळगाव (हरेश्वर) या प्राथमिक शाळेत १२ शिक्षक भरतीस मंजुरी असतांना सन २०१७ ते २०२१ या कार्यकाळात व त्या कालावधीत असलेले संस्थेचे अध्यक्ष व शिक्षणाधिकाऱ्यांनी १० शिक्षकांच्या नेमनूकीला व्यक्तीगत मान्यता दिलेली होती.
परंतु ही मान्यता देतांना शासनाचे व प्रशासनाचे निकस, अटी व नियम डावलून हाती असलेल्या सत्तेचा व पदाचा गैरवापर करुन चुकीच्या पध्दतीने शिक्षकांची (नोकर) भरती केली असल्याची तक्रार पिंपळगाव हरेश्वर ग्रामविकास मंडळाचे सदस्य मा. श्री. किशोर भिकनराव गरुड यांनी १० फेब्रुवारी २०२२ रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी जळगाव यांच्याकडे केली असून या तक्रारीबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही चौकशी केली नसल्याने आता आंदोलन छेडणार असून न्यायालयात रितसर दाद मागणार असल्याची माहिती तक्रारदार मा. श्री. किशोर गरुड यांनी सत्यजीत न्यूजकडे कथन केली आहे.
तसेच ग्रामविकास मंडळ पिंपळगाव हरेश्वर संचलित खाजगी प्राथमिक विद्यामंदिरात सन २०१७ ते २०२१ या कार्यकाळात जेव्हा १० शिक्षकांची भरती करण्यात आली, त्यावेळी मी या शिक्षक भरतीला व दिलेल्या मान्यतेसाठी लेखी व तोंडी हरकत घेतली होती. परंतु संस्थेचे अध्यक्ष व संबंधित शिक्षणाधिकारी यांनी मी घेतलेल्या हरकतीकडे व तक्रारीकडे जाणून, बुजून दुर्लक्ष करत या १० शिक्षकांच्या नेमनूकीला व्यक्तीगत मान्यता दिली असल्याने एकप्रकारे सत्तेचा गैरवापर केलेला आहे. म्हणून मी संस्थेचा सभासद व राज्यघटने प्रमाणे एक जबाबदार नागरिक या नात्याने शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार उघड करुन मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवणे हे माझे कर्तव्य असल्याचे मत मा. श्री. किशोर गरुड यांनी व्यक्त केले आहे.
(मा. श्री. किशोर गरुड हे आजपर्यंत केलेल्या तक्रारी अर्जासोबत पुराव्यानिशी प्रसारमाध्यमांना माहिती देत चौकशीसाठी मागणी करत आहेत. याबाबत आम्ही संस्थेचे अध्यक्ष व एका सभासदांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करुन संबधितांनी दिलेल्या तक्रारीबाबत सत्यता जाणून घेण्यासाठी खुलासा मागीतला आहे. मात्र संबधितांनी अद्यापही कोणत्याही प्रकारचा खुलासा किंवा तक्रारदाराच्या आरोपाचे खंडण केलेले नसल्याने तक्रारदारांनी शिक्षणसंस्थे विरोधात केलेले आरोप खरे की खोटे हे समजणे कठीण असून सर्वसामान्य जनता व सूज्ञ नागरिकांमध्ये संशय कल्लोळ निर्माण झाला आहे.)