कुऱ्हाड बुद्रुक येथील दलित वस्तीत चिखलाचे साम्राज्य.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथे दलित बांधवांच्या वस्तीत मागील पंधरा वर्षापासून अनेक समस्या भेडसावत असून आता पावसाळा संपला तरीही या दलित वस्तीत चिखलाचे साम्राज्य कायम आहे. याबाबत कुऱ्हाड बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे वारंवार तक्रार करुनही कोणताही फायदा होत नसल्याने दलित बांधवांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथे दलित बांधवांची पंधरा घरे आहेत. यांच्या वस्तीच्या परिसरात मागील काही महिन्यापासून घाणीचे साम्राज्य पसरले असून गल्लीबोळात व अंगणात डबके साचले आहेत. या डबक्यातील पाण्यात डुकरे व कुत्रे दिवसभर येऊन बसतात तसेच याच घाणीच्या साम्राज्यामुळे माशा व डासांची उत्पत्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने येथील रहिवाशांना डासांचा त्रास होत आहे. तसेच डासांमुळे रात्रीची झोप घेणे मुश्कील झाले असून अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.
यामागील कारण म्हणजे गावातील काही धनदांडग्यांनी अतिक्रमण करून तसेच घराचे बांधकाम करतांना सांडपाण्याच्या गटारीवर अतिक्रमण करत गटारी बुजवून टाकल्या असल्याने गावातील सांडपाणी वाहून न जाता ते थेट रस्त्यावर येत असल्याने या भागात मोठमोठे डबके तयार झाले आहेत. याबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही काहीएक फायदा होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले असून ही समस्या त्वरित न सोडवल्यास आम्ही आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.
याबाबत कुऱ्हाड ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही ही समस्या येत्या आठ दिवसात सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे ग्रामसेवक नियमितपणे दररोज कुऱ्हाड ग्रामपंचायतीचे कार्यालयात येत नसल्याने कुऱ्हाड ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता या ग्रामसेवकांची कुऱ्हाड गावासह अतिरिक्त इतर तीन ग्रामपंचायतीवर नियुक्ती करण्यात आली असल्याने या ग्रामसेवकांना प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीचे कार्यालयात दररोजची उपस्थिती देणे शक्य नसल्याचे समजते.