दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१०/२०२२

सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानदार व सेल्समन यांच्या विरोधात रेशनकार्ड धारकांनी वारंवार अर्जफाटे व तक्रारी करुनही पुरवठा विभागाकडून किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडून कोणतीही चौकशी किंवा कारवाई होत नसल्याने सातगाव डोंगरी येथील रेशनकार्ड धारकांनी सरतेशेवटी पाचोरा, भडगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांची भेट घेऊन रेशन दुकानात कार्यरत असलेले सेल्समन शंकर पवार व यांना पाठीशी घालणारे सातगाव डोंगरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळा विरोधात आज दिनांक ०२ ऑक्टोबर २०२२ रविवार रोजी सर्व काळे धंदे पुराव्यानिशी सादर करुन संबंधित रेशनिंग दुकानाच्या सेल्समनची सखोल चौकशी करून आजपर्यंत करण्यात आलेल्या धान्यांच्या काळाबाजाराची चौकशी करुन हे स्वस्त धान्य दुकान दुसरीकडे चालवण्यासाठी देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील.
सातगाव डोंगरी येथील रेशनकार्ड धारकांच्या तक्रारी ऐकून घेत आज सुट्टी असल्याकारणाने तुम्ही उद्या या उद्याच्या, उद्याच चौकशी लाऊन संबंधित रेशनिंग दुकानाच्या कारभारात काही काळे गोरे आढळून आल्यास योग्य ती कारवाई करुन रेशनकार्ड धारकांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी मी बांधील असल्याचे सांगितले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की
(सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकान हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून चालवण्यात येत असले तरी संबंधित सेल्समन हे मनमानी कारभार करत असून यांच्या विरोधात रेशनकार्ड धारकांनी तक्रारी केल्यास पैशाच्या जोरावर ते गावातील काही मर्जीतील लोकांना हाताशी धरून संबंधित तक्रारदारांवर खोटे गुन्हे दाखल करून तोंड दाबण्याचा प्रयत्न करतात अशी माहिती समोर येत असून तसे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यामुळे गावात अशांतता निर्माण झाली असल्यावर ही मात्र सातगाव डोंगरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ या विषयावर मुग गिळून गप्प बसले असल्याने तसेच पुरवठा विभाग पाचोरा यांच्याकडून कोणतीही चौकशी किंवा कारवाई होत नसल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून इतरही त्रस्त रेशनकार्ड धारकांनी खोटे गुन्हे दाखल होण्याच्या भितीमुळे हाताची घडी तोंडावर बोट अशी भुमिका घेतील आहे. तसेच संबंधित सेल्समन व पाचोरा पुरवठा विभागातील काही अधिकारी व कर्मचारी यांचे सलोख्याचे संबंध असल्याने सगळे काही गोलमाल सुरु असल्याचे आरोप सातगाव डोंगरी ग्रामस्थांनी केला आहे.)

पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकान हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून मागील बऱ्याच वर्षांपासून चालवण्यात येत आहे. हे स्वस्त धान्य दुकान चालवण्यासाठी शंकर बाजीराव पवार यांची सेल्समन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. शंकर पवार हे बऱ्याचशा वर्षांपासून सेल्समन आहेत. यांची नेमणूक झाल्यानंतर काही महिने स्वस्त धान्य दुकानाचा कारभार व्यवस्थित चालत होता तसेच रेशनकार्ड धारकांना धान्यही पुरेपूर व वेळेवर मिळत होते त्यामागील कारण म्हणजे त्यावेळी धान्य वाटप करतांना पावती देण्यात येत होती. परंतु नंतर ईपाश मशिन आल्यावर सगळेच काही काळे, गोरे सुरु झाल्याचा आरोप सातगाव डोंगरी येथील रेशनकार्ड धारकांनी केला आहे.

तसेच सोसायटीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या दुकानात नियुक्त सेल्समन शंकर बाजीराव पवार हे मागील चार वर्षापासून मनमानी कारभार करत आहेत व लाभार्थ्यांना पुरेपूर धान्य वाटप करत नाहीत. धान्य वाटप करतांना पावती देत नाही. दक्षता समितीची मीटिंग आयोजित करत नाही. म्हणून काही ग्रामस्थांनी गृप ग्रामपंचायत सातगाव डोंगरी यांच्याकडे तक्ररी अर्ज दाखल केला होता.

या अर्जाची दखल घेत सरपंच सौ. उषाबाई सुभाष पाटील यांनी दिनांक २८ ऑक्टोबर २०२० रोजी मासिक सभा आयोजित केली होती. या मासिक सभेत ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. बालु राघो पाटील यांच्या सुचनेवरुन संबंधित स्वस्त धान्य दुकानदार व सेल्समन यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी म्हणून ठराव करवा असे मत मांडले होते. या विषयाला ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. पंडित नामदेव पाटील यांनी अनुमोदन देऊन सर्वानुमते ठराव मंजूर करून मा. तहसीलदार साहेब पाचोरा यांना लेखी पत्राद्वारे संबंधित रेशनिंग दुकान व सेल्समन यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींची चौकशी होऊन योग्य ती कारवाई करण्यासाठी विनंती केलेली आहे. यानंतर संबंधितांकडून चौकशी झाली किंवा नाही याबाबत सत्यजित न्यूज कडे तशी माहिती प्राप्त झालेली नाही.

परंतु कदाचित मागील पत्राची दखल घेऊन चौकशी करण्यात आली नसावी असा अंदाज आहे. कारण आजही या स्वस्त धान्य दुकानाच्या सेल्समन बाबतीत तक्रारी कायम असल्यानेच गृप ग्रामपंचायत सातगाव डोंगरीच्या सरपंच सौ. उषाबाई सुभाष पाटील यांनी दिनांक १६ सप्टेंबर २०२२ गुरुवार रोजी मा. तहसीलदार साहेब पाचोरा यांना लेखी स्वरूपात पत्र देऊन आपल्या स्तरावरुन चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी विनंती केली आहे.

कारण हे स्वस्त धान्य दुकान जरी सातगाव डोंगरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून चालवण्यात येत असले तरी या दुकानात नियुक्त असलेले सेल्समन यांच्या मनमानी कारभारामुळे रेशनकार्ड धारकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत असून शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार पुरेपूर धान्य अधिकृत रेशनकार्ड धारकांना मिळत नसल्याच्या तक्रारी मागील तीन वर्षांपासून शेकडो लाभधारक करत आहेत.

वास्तविक पाहता रेशनकार्ड धारकांच्या तक्रारी आल्यानंतर जी सहाकरी संस्था हे दुकान चालवत आहे म्हणजे सातगाव डोंगरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाने याची दखल घेऊन सत्यता पडताळून पाहात सेल्समन जर मनमानी करत असेल तर त्याला समज देणे किंवा त्याजागी दुसरा सेल्समन नेमणूक करणे तसेच रेशनकार्ड धारकांच्या तक्रारी खोट्या असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते.

परंतु जवळपास मागील तीन वर्षांपासून सेल्समन व रेशनकार्ड धारकांच्या तक्रारींचा संघर्ष सुरू असतांना विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सेल्समनची मनमानी व दादागिरी वाढल्याने हक्काचे रेशनिंगचे धान्य मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या रेशनकार्ड धारकांच्या सहनशीलताचा अंत झाला व यातूनच दिनांक १७ सप्टेंबर २०२२ शनिवार रोजी सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानाचे सेल्समन शंकर बाजीराव पवार यांच्या विरोधात रेशनकार्ड धारक लाभार्थी विलास मुरलीधर काथार यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला एन. सी. आर. ३२३, ५०४ नुसार तक्रार दाखल करण्यात आली असल्याने गावपातळीवर जोरदार चर्चा सुरू आहे.

याबाबत विलास मुरलीधर काथार यांनी सत्यजित न्यूजकडे संपर्क साधून दिलेली माहिती अशी की डोंगरी सातगाव येथील स्वस्त धान्य दुकान हे सातगाव डोंगरी येथीलच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून चालवण्यात येत आहे. या दुकानात सेल्समन म्हणून शंकर बाजीराव पवार हे काम पहात असून हे रेशनिंग वाटप करतांना ई पॉश मशीन खराब असल्याचा बहाणा पुढे करत रेशनकार्ड धारकांना धान्य वाटप करतांना ईपाश मशीनवर अंगठा घेऊन पावती न देताच धान्य वाटप करतांना लाभधारकांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार धान्य वाटप करत नाहीत दरमहा दरडोई धान्य कमी आल्याचे सांगून कमी धान्याचे वितरण करतात याबाबत जास्त विचारणा केली असता अरेरावीची भाषा करुन पटत असेल तर घ्या नाहीतर चालते व्हा असे सांगून वाद घालतात व हाकलून लावतात तसेच आमच्या विरोधात कुठेही अर्जफाटे करा आमचे काहीच होणार नाही उलट आम्ही सांगितले तर तुमचे रेशनकार्ड रद्द करुन दाखवून देतो अशी धमकी भरुन खोटा गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगतात असा खुलासा दिला आहे. तसेच मी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केल्यानंतर मला संबंधित सेल्समन हा हस्ते, परहस्ते धमकावत असून भविष्यात माझ्यावर खोटा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी आता मा. तहसीलदार साहेब पाचोरा यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले.

(स्वस्त धान्य दुकान म्हणजे गोरगरिबांच्या नावाने येणाऱ्या धान्याचा काळाबाजार करुन स्वताच चांगभलं करुन घेण्यासाठी असलेली योजना आपल्याच बापाची समजून पुरवठा अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदार वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही कारण आजच्या परिस्थितीत गावागावातून स्वस्त धान्य दुकानदार दरमहा वेळेवर व पुर्णपणे धान्य वाटप करत नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून याबाबत सखोल चौकशी होत नसल्याने या भ्रष्टाचाराला दुजोरा मिळाला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून वाटप न झालेले धान्य मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. असे काळ्या बाजारात जाणारे धान्य कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ट्रक च्या ट्रक पकडून जमा केलेल्या आहेत. तसेच बऱ्याचशा तांदळाच्या फॉक्टरीत हा तांदूळ पोहच होतो व तेथे त्याला पॉलिश करून पुन्हा बाजारात आणला जात असल्याचे जनमानसातून चर्चेतून ऐकायला मिळत आहे.)

या बाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यातील गावागावांतील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून गावागावातून वाढत्या तक्रारी समोर येत आहेत. पैकी काही गावातून पाचोरा तालुक्याचे मा. तहसीलदार, पुरवठा विभाग तसेच मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार अर्जफाटे व तक्रार करुनही काहीएक फायदा होत नसल्याने व मा. जिल्हाधिकारी व मा. तहससीलदार साहेब यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी पुरवठा विभागाला वारंवार आदेश दिल्यावरही पाचोरा पुरवठा विभागाकडून फक्त आणि फक्त नावालाच संबंधित स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीसाठी नाटक केले जाते व योग्य प्रकारे चौकशी न करता किंवा तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची शहानिशा न करता स्वस्त धान्य दुकानदारांना पाठीशी घालण्याचा गोरखधंदा करुन स्वस्त धान्य दुकानदार व पुरवठा विभागाचे जबाबदार चौकशी अधिकारी मिलीभगत करून संबंधित तक्रार खोटी असल्याचे भासवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोटा अहवाल पाठवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करून जनतेच्या भावनांशी खेळ खेळत असल्याचा आरोप गावागावांतील तक्रारदारांनी केला आहे.

सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार ई पॉश मशिन खराब असल्याचा बहाणा करत रेशनकार्ड धारकांना किती धान्य वितरीत केले गेले आहे याची कोणतीही पावती देत नाहीत. तसेच प्रत्येक व्यक्तीला शासनाकडून ठरवून दिलेले दरडोई धान्य पुर्णपणे न देता कमी धान्याचे वाटप करत आहे. तसेच मोफतचे धान्य कमी आलेले आहे किंवा या महिन्यात वरुनच धान्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही. अश्या सबबी सांगून रेशनकार्ड धारकांना कमी धान्याचे वाटप करण्यात येत आहे. अश्या तक्रारी गावागावातून मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.

विशेष म्हणजे स्वस्त धान्य दुकानात स्वस्त धान्य दुकानदारांकडून कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नाही. नियमानुसार प्रत्येक धान्य दुकानातून दुकानाचे नाव, दुकान कुणाच्या नावावर आहे. दुकानाचा लायसन क्रमांक, दरमहा मिळणारे गहू, तांदूळ व इतर धान्य किती मिळाले, किती वाटप झाले, किती शिल्लक आहे याबद्दल दररोज माहिती लिहिणे क्रमप्राप्त आहे. तसेच तालुका व जिल्हास्तरीय संबंधित अधिकाऱ्यांचे कार्यालयीन दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक लिहिणे बंधनकारक आहे. तरीही असे माहिती फलक कुठेच दिसून येते नाहीत.