विद्युत वितरण कंपनीचा वायरमन व विद्युत सहाय्यक दाखवा बक्षीस मिळवा. (भाग, १).
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०५/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, कोठडी तांडा, वडगाव जोगे या पाचही गावांसाठी विद्युत वितरण कंपनीकडून एक वायरमन, एक विद्युत सहाय्यक व एक हेल्पर अश्या तीन कर्मचारी वर्गाची नेमणूक केलेली आहे. परंतु मागील तीन वर्षांपासून वरील पाचही गावांचा कारभार फक्त आणि फक्त हेल्परच्या भरवशावर सुरु असल्याने विद्युत ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून दुसरीकडे विद्युत चोरी मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
(अंबे वडगावच्या विद्युत ग्राहक ८४ च्या फेऱ्यात.)
याबाबत सविस्तर वृत्त असे की वरील पाचही गावांसाठी मागिल तीन वर्षांपासून वायरमनची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात आलेली नसल्याने या गावांचा कारभार विद्युत सहाय्यक व हेल्पर यांच्या भरवशावर चालतो आहे. या परिसरात मागील तीन वर्षांपासून अविनाश राठोड नामक व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे. या अविनाश राठोड यांची नेमणूक झाल्यापासूनच विद्युत ग्राहकांना शनी लागला असे म्हणने वावगे ठरणार नाही.
कारण की अविनाश राठोड यांची अंबे वडगाव येथे नेमणूक झाल्यापासून ते कधीच नियमितपणे मुख्यालयात आलेले नाही किंवा आजही येत नाही. पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळ्यात विद्युत पुरवठ्यासाठी काहीही समस्या उद्भवल्यास विद्युत ग्राहक या अविनाश राठोड यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून, साधून बेजार होतात. परंतु हे महाशय येतो, आलोच या शब्दांचा वापर करून वेळ मारुन नेतात. या प्रकारामुळे गरजु शेतकऱ्यांना सरतेशेवटी पदरमोड करून खाजगीत आपली समस्या सोडवून घ्यावी लागते. याबाबत वारंवार अर्जफाटे करुन सुध्दा संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने हा कर्मचारी मागील तीन वर्षांपासून फुकटचा पगार घेत असल्यावर ही याची नुकतीच बढती झाली असून आता राठोड हे वायरमन पदावर कार्यरत आहेत.
(विद्युत सहाय्यक झाला वायरमन तरीही बदली नाही.)
संबंधित अविनाश राठोड या कर्मचाऱ्याची अंबे वडगाव येथे नियुक्ती झाल्यापासून हा कर्मचारी नियमितपणे मुख्यालयात येत नसल्याच्या व विद्युत ग्राहकांच्या तक्रारी सोडवत नसल्याच्या तक्रारी मागील तीन वर्षांपासून विद्युत ग्राहक वारंवार तक्रारी करुनही यांच्यावर कोणतीही कारवाई झाली तर नाहीच परंतु या कर्मचाऱ्याला घरबसल्या बढती मिळाली असून आता अविनाश राठोड वायरमन पदावर कार्यरत आहेत. असे असले तरी यांच्या वर्तणुकीत कोणताही बदल घडलेला नसल्याने ते आजही नियमितपणे मुख्यालयात येत नसून उंटावरून शेळ्या चालतांना दिसून येतात.
(अविनाश राठोड यांचे पाठिराखे कोण ?)
अविनाश राठोड या विद्युत कर्मचाऱ्याची अंबे वडगाव येथे विद्युत सहाय्यक पदावर नियुक्ती झाल्यानंतर हा कर्मचारी सुरवातीला फक्त एक ते दिड महिना गावात दिसून आला तदनंतर राठोड हा नियमितपणे कधीच मुख्यालयात आलेला नाही व आजही येत नाही. फक्त अधिकारीवर्ग येणार असतील किंवा सक्तीची वसुली असेल तेव्हाच हजार होतो. याबाबत वारंवार तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने अधिक माहिती जाणून घेतली असता (अविनाश राठोड हा पाचोरा कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समाजबांधव व नातेवाईक) असल्यामुळे यांच्यावर कारवाई होत नसल्याचे जनतेतून ऐकावयास मिळते.
हा कर्मचारी मुख्यालयात येत नसल्याने वरील पाचही गावात मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी केली जात असून विद्युत ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मागील पाच महिन्यात शेत शिवारात विद्युत पुरवठा नियमित रहात नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच विद्युत वाहिन्यांची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने शेत शिवारात शॉटसर्कीटने शेतातील शेतमाल, ठिबक संच, चारा, शेतीच्या वापरासाठी लागणारा औत, फाटा व इतर साहित्य जळुन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार अर्जफाटे करुन फायदा होत नसल्याने विद्युत ग्राहक आंदोलन छेडण्याचा तयारीत आहेत.