खरा इतिहास अभ्यासण्याची गरज : शिव व्याख्याते प्रदीप देसले.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०२/२०२२
अखिल भारतीय मराठा महासंघ,पाचोरा द्वारा आयोजित शिवजन्मोत्सव व्याख्यानमाला २०२२ अंतर्गत आज दिनांक २० फेब्रुवारी रविवार रोजी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर शिव व्याख्याते शिवश्री प्रदीप देसले (भडगाव) यांनी मौलिक विचार व्यक्त केले. मराठा साम्राज्याच्या विषयी विपर्यस्त लेखन करून खोटा इतिहास व गैरसमज पसरविण्यात आला होता. मराठा बांधवांनी खऱ्या इतिहासाचा योग्य पद्धतीने अभ्यास करण्याची गरज निर्माण झालेली आहे, असे परखड मत व्याख्याते प्रदीप देसले यांनी यावेळी मांडले.
मराठा महासंघ पाचोरा द्वारा छत्रपती शाहू महाराज सामाजिक विकास मंडळ तसेच राजे संभाजी युथ फाउंडेशन पाचोरा यांच्या सहकार्याने आयोजित या ऑनलाईन शिवजन्मोत्सव व्याख्यान मालेत पहिले पुष्प गुंफतांना शिवश्री प्रदीप देसले बोलत होते. या ऑनलाईन व्याख्यानमालेला शेकडो श्रोत्यांनी उपस्थिती नोंदवली.
यावेळी बोलताना प्रदीप देसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतकऱ्यांविषयीचे उदारमतवादी धोरणात्मक निर्णय, शेतकऱ्यांना अधिक संरक्षण , सरकारातून शेतकऱ्यांसाठी विविध स्वरूपाची मदत, सर्व जाती धर्मा विषयी उदार व सहिष्णूतेचे धोरण- इत्यादी विषयांबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील स्त्रियांमध्ये संरक्षणाची भावना निर्माण केली व त्या काळातील रूढी परंपरांना छेद देत महिलांना वैचारिक स्वातंत्र्य बहाल केले हा सुधारणावादी विचार त्यांनी अधोरेखित केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांची स्वतःच्या आचरणातून व कार्यप्रणाली मधून अंमलबजावणी केली, छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी द्वेष भावनेने पसरविले गेलेले गैरसमज आता हळू हळू दूर होत असून समाजाने खऱ्या इतिहासाचा योग्य पद्धतीने अभ्यास करण्याची गरज निर्माण झालेली आहे असे मत शिवश्री प्रदीप देसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
येथील शितल अकॅडमी व टायगर किड्स चे संचालक प्रा. रोहन पाटील सरांनी या ऑनलाईन व्याख्यानमालेला तंत्र सहाय्य केले मराठा महासंघाचे तालुका चिटणीस शिवश्री चंद्रकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवश्री शिवाजी भास्करराव शिंदे यांनी प्रमुख वक्ते कार्यकारणी सदस्य व सहयोगी संघटना आणि सर्व ऑनलाईन उपस्थित श्रोत्यांचे आभार मानले.
उद्या दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ सोमवार रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजे दरम्यान व्याख्याते शिवश्री पंकज रणदिवे (चाळीसगाव) यांचे “शिवराय : शिक्षण व संस्कार” या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.