अंबे वडगाव गावात मोकाट कुत्रे व गावठी डुकरांचा उपद्रव, महिलावर्गासह ग्रामस्थ त्रस्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०४/२०२३
(अंबे वडगाव गावात गावठी डुकरे व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनला साकडे घातले परंतु गावात एकमत नसल्याने काहीएक फायदा होत नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे तसेच गाव पंचांनी ज्या प्रकारे जागरुकता दाखवून भाविक, भक्तांनी नवस फेडण्यासाठी देवाच्या नावाने सांड सोडलेल्या गायींचा लिलाव करण्याचे ठरविले आहे तसाच निर्णय गावठी डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी घ्यावा कारण आता ग्रामपंचायतीचवर प्रशासक राजवट असल्याने हे काम पंच मंडळीने करावे म्हणजे ग्रामस्थांची समस्या दुर होईल.)
पाचोरा तालुक्यातील वडगाव अंबे गावात गावठी डुकरे व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून जेष्ट नागरिक, महिला व मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या बाबतीत सविस्तर वृत्त असे की वडगाव अंबे गावात शेंदूर्णी येथील अंबादास जाधव या इसमाने त्यांच्या मालकीची डुकरे सोडलेली आहेत.
परंतु गावात डुकराची संख्या मोठ्या प्रमाणात झाली असल्याने ग्रामस्थांना खुपच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे अंबे वडगाव हे गाव हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करत असतांनाच गावातील वैयक्तिक शौचालयाच्या कामात भ्रष्टाचार झाला असून काही शौचालये चोरीला गेली आहेत. तसेच सार्वजनिक शौचालये अपूर्ण अवस्थेत आहेत व त्या शौचालयाच्या चारही बाजूंनी काटेरी कुंपण घालून त्या ठिकाणी एका इसमाने अतिक्रमण करुन खळे तयार केले आहे. तसेच कुऱ्हाड रस्त्यावर असलेली चांगली सुसज्ज अशी शौचालय पाडण्यात आली (परंतु ही सुसज्ज अशी शौचालये पाडल्याने शासनाचा बराचसा निधी वाया गेला आहे.) ही शौचालये पाडण्यात आली असल्याने महिलांना नैसर्गिक विधीसाठी बाहेर उघड्यावर शौचाला जावे लागते, उघड्यावर शौचाला गेल्यावर या गावठी डुकरांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. यापासून सुटका करुन घेण्यासाठी महिलांना हातात काठी घेऊन जावे लागते आहे.
तसेच आता उन्हाळ्यात कापूस, तुर, चवळी, मुग, धान्य घरासमोर वाळत घातल्यास तसेच आता वडे, पापड, कुर्डया, शेवया हे वाळवणीचे पदार्थ करण्याचे दिवस असल्याने गावातील बहुसंख्य महिला हे खाद्यपदार्थ बनवून अंगणात वाळवण्यासाठी घालतात तेव्हा ही डुकरे यावर ताव मारतात व नुकसान करतात. तसेच लहान, लहान मुले दुकानातून काही खाद्यपदार्थ आणत असतांना ही मोकाट डुकरे या मुलांच्या अंगावर धाऊन जातात. आता उन्हाळ्यात काही महिला व ग्रामस्थांकडे पंखा नसल्याने ते घरात उकाडा होत असल्याने अंगणात खाट टाकून झोपतात तेव्हा हीच डुकरे रात्रभर गावात बोंबलत फिरतांना थेट खाट (बाजे) खालुन घुसतात त्यांना नको त्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. तसेच पावसाळ्यात हिच डुकरे गावाजवळील शेतात घुसून शेतमालाचे नुकसान करतात.
यातच भरीतभर म्हणजे गावठी कुत्र्यांची संख्या वाढली असून या कुत्र्यांना खाद्य मिळत नसल्याने हे डुकरांचा फडशा पाडून ती खातात या प्रकाराने कुत्र्यांना रक्ताची चटक लागल्याने ही कुत्री लहान बालके व प्रोढव्यक्तीवर हल्ला चढवून चावा घेतात.
या डुकरांचा व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने वारंवार प्रयत्न केले पोलीस स्टेशनला डुकरांच्या मालकाविरूध्द अर्ज व ठराव देऊन डुकरांच्या बंदोबस्ताची मागणी केली. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी वारंवार संबधीतास बोलावून तोंडी समज दिल्यावरही आंबादास जाधव काहीएक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसून उलट तक्रारदार ग्रामस्थांना दमदाटी करून घाबरवण्याचा प्रयत्न करतो तरी संबंधित डुकराच्या मालकावर त्वरित कडक कारवाई करून गावातील डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वडगाव अंबे ग्रामस्थांनी केली आहे.
येत्या आठदिवसात यांचा बंदोबस्त न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा पावित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.
महत्वाचा मुद्दा ~
दिलीप जैन यांच्या घराजवळ एक म्हाताऱ्या आजीबाई एकट्या रहात असून यांचे घर व्यवस्थित नसल्याने त्या उघड्यावर पडलेल्या असतात. त्या खुपच वयोवृद्ध असून त्या आजीबाईंना स्वयंपाक करता येत नसल्याने त्यांना शेजारचे लोक जेवण पुरवतात आजीबाईंचे जेवण झाल्यावर थोडेफार जेवणाचे पदार्थ शिल्लक राहिल्यास त्या आजीबाईं भुख लागेल तेव्हा खाऊ याकरिता झाकून ठेवतात मात्र ही गावठी डुकरे या आजीबाईंना धक्का देऊन ते पदार्थ खाऊन टाकतात. या प्रकारामुळे आजीबाईंच्या जीविताला घोका होऊ शकतो. विशेष म्हणजे या आजीबाईंना घरकुल योजनेचा लाभ मिळाला होता परंतु त्या आजीबाईंचे घरकुल योजनेचे काय झाले कोण जाणे जर या आजीबाईंचे घरकुल बांधले गेले असते तर त्यांच्यावर अशी उघड्यावर रहाण्याची वेळ आली नसती अशीही माहिती समोर येत आहे.
या आजीबाईंची दयनीय अवस्था पाहून यांना लवकरच माणूसकी सेवाभावी संस्थेला कळवून त्यांची व्यवस्था लावण्यासाठी गरजेचे असल्याने तसे प्रयत्न सुरु आहेत.