लोहारी ते साजगाव रस्त्याचे खडीकरण निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार, चौकशीची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील लोहारी ते साजगाव हा दोन गावांना जोडणारा रस्ता २५/१५ चे मूलभूत सुविधा योजनेतून करण्यात येत आहे. या रस्त्याचे खडीकरण करण्यासाठी २० लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे. परंतु या रस्त्याचे खडीकरण करतांना शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी प्रमाणे काम होत नसल्याची तक्रार लोहारी व साजगाव येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की लोहारी ते साजगाव हा शिवारातील दोन गावांना जोडणारा रस्ता आहे. परंतु या रस्त्याचे २५/१५ या मुलभूत सुविधा योजनेअंतर्गत खडीकरण सुरू करण्यात येत असून खडीकरण करतांना रस्त्यावर अगोदर खाली खोदकाम करणे, पाणी मारणे, प्रतीची खडी टाकून मुरूम वापरणे हे ग्रास्य असतांना या रस्त्यावर फक्त निकृष्ट दर्जाची खडी टाकून मुरुम न वापरता रस्त्याच्या दुतर्फा असलेली माती टाकून खडीकरण करण्याचा घाट संबंधित ठेकेदाराने सुरु केला आहे. तसेच या रस्त्याचे काम हे संथगतीने होत असल्याने शेतात जाणे, येणे मुश्कील झाले असून शेतात बियाणे, खते नेणे तसेच शेतातून शेतीमाल घरी आणतांना बैलांचे हाल होत असून आतापर्यंत चार ते पाच बैलांचे पाय मोडून (अस्थिभंग) होऊन किंमती बैल निकामी झाले आहेत. तर काही दुचाकी स्वार दुचाकीवरून पडून जखमी झाले आहेत.
या रस्त्याचे कामकाज ठेकेदार मनमानी पध्दतीने करत असल्यामुळे भविष्यात हा रस्ता जास्त दिवस टिकणारा नसून पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावर मुरुमा ऐवजी मातीचा वापर होत असल्याने चिखल होण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरून लोहारी, साजगाव या गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी महत्त्वाचा रस्ता असून (जळगाव) जाण्यासाठी कमी अंतराचा रस्ता असल्याने पिंपळगाव हरेश्वर, वरखेडी, शिंदाड, डांभुर्णी, सावख या मोठ्या लोकसंख्येच्या गावासह पंचक्रोशीतील पंधरा गावातील वाहनधारक या रस्त्यावरून वापरतात.
म्हणून या रस्त्याच्या कामाची चौकशी होऊन हे काम चांगल्या प्रकारे व्हावे अशी मागणी लोहारी, साजगाव तसेच जवळपासच्या सर्व गावातील सर्व नागरीकांनी व वाहनधारकांनी केली आहे.