अंबे वडगाव ते पाचोरा रस्यावर खड्डेच खड्डे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव ते पाचोरा दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी होण्याची मालिका सुरू आहे. हे मोठमोठे खड्डे रात्रीच्या वेळी दिसून येत नसल्याने रात्रीच्या वेळेस होणाऱ्या अपघाताची संख्या जास्त आहे.
वरखेडी येथील पि.जे. रेल्वे फाटकाजवळ एका धार्मिक स्थळासमोरच भररस्त्यात पाच फूट खोल व दीड फूट रुंदीचा खड्डा मागील दोन महिन्यापासून पडला असून पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.
(खड्ड्यात पडून एका दुचाकीस्वाराचा अपघात झाल्यानंतर मुरुम टाकून खड्डा भरतांना लोहारी येथील नागरिक.)
हा खड्डा लक्षात यावा म्हणून भोकरी येथील ग्रामस्थांनी त्या खड्ड्यामध्ये एक लाकडी दांडा उभा करून त्याला कापडी पिशवी घातली आहे. यामागील कारण म्हणजे जेणेकरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरुंना येथे खड्डा आहे हे लक्षात यावे म्हणून हा प्रयत्न केला आहे.
(येतो सिर्फ झाकी है,बहोत से खड्डे दिखाणा बाकी है.)
विशेष म्हणजे याच रस्त्यावरून मागील आठवड्यात दोन ते तीन मंत्र्यांचा दौरा झाला आहे. परंतु तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत थोडीशी लाज वाटली नसल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे. तसेच पाचोरा शहर जारगाव चौफुली पासून तर आंबे वडगाव पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून या अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.
तसेच या अतिक्रमीत व्यवसाईकांच्या दुकानासमोर ग्राहकांची गर्दी होत असल्याने वाहनधारकांना वाहन चालवणे जिकिरीचे झाले असून अतिक्रमणधारक, ग्राहक व वाहनचालक यांच्यात वारंवार भांडणे होत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
म्हणून आता तरी पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देईल का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.