स्वस्त धान्य वितरित करतांना शासकीय गोदामात सावळा गोंधळ, पाचोरा तालुक्यातील रेशनिंग दुकानदार, वड्याच तेल वांग्यावर काढत असल्याचा प्रकार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०२/२०२३
रेशनकार्ड मिळवण्यासाठी तसेच बारा अंकी कोड मिळवून घेत रेशनकार्ड ऑनलाईन करुन घेण्यासाठी तसेच स्वस्त धान्य दुकानातून ध्यान्य पदरात पाडून घेण्यासाठी दररोज शेकडो गरजू लाभार्थी पुरवठा विभाग, ग्राहक सेवा केंद्रावर हेलपाटे घालतांना दिसून येत आहेत. हा प्रकार येथेच थांबत नसून संपूर्ण तालुक्यात बोटावर मोजण्याइतके रेशन दुकानदार सोडले तर सगळेच धान्य वाटप करतांना मोठ्या प्रमाणात हेराफेरी करुन एक प्रकारे मयताच्या टाळु वरचे लोणी खाण्यासारखा प्रकार करत आहेत.
अशीच तक्रार पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथील रेशनकार्ड धारकांनी सत्यजित न्यूज कडे केली होती. त्याअनुषंगाने सत्यजित न्यूजच्या प्रतिनिधीने थेट रेशनिंग दुकानावर भेट देऊन सेल्समनला भेटून लोकांनी केलेल्या तक्रारीबाबत विचरले असता व सत्य परिस्थिती जाणून घेतली असता संबंधित रेशन दुकान हे एका महिला बचतगटाने घेतले असून धान्य वाटप करतांना या दुकानात नियमितता नसल्याने तसेच प्रत्येक रेशनकार्ड धारकांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे धान्य मिळत नसून प्रत्येक रेशनकार्ड धारकाला दोन ते तीन किलो धान्य कमी दिले जात असल्याचे दिसून आले.
याबाबत संबंधित सेल्समनला विचारले असता आम्हाला शासकीय धान्य गोदामातून धान्य देतांना वजन माप न करताच दिले जात असल्याने पन्नास किलो वजनाच्या प्रत्येक गोणीमागे दोन ते चार किलो वजनाची घट लागते तसेच आम्हाला वाहतूक व हमाली खर्च लागतो म्हणून हा खर्च व वजनात येणारी घट भरुन काढण्यासाठी आम्ही प्रत्येक रेशनकार्ड धारकांना दोन ते तीन किलो धान्य देऊन आमची होणारी आर्थिक तुट भरुन काढतो असे निर्लज्जपणे उत्तर दिले. म्हणून रेशनिंग दुकानावर हे वड्याचे तेल, वांग्यावर काढत आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.