शेंदुर्णी शिवारात केळीच्या शेतात काम करणाऱ्या युवकावर बिबट्याचा हल्ल्या, युवक जखमी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०६/२०२२
(वेळ आली होती, पण काळ आला नव्हता. नशिब बलवत्तर म्हणून शेख रईस बालबाल बचावले.)
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी मालखेडा रस्त्यावर केळीच्या शेतात काम करत असलेल्या युवकावर मादी बिबट्याने अचानकपणे हल्ला केला. परंतु या अचानकपणे झालेल्या हल्यात शेख रईस शेख अयूब (३२) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. हल्ला होताच युवकाने जोरजोरात आरडाओरडा केल्यामुळे जवळच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांनी एकच गोंगाट करुन मादी बिबट्याला पळवून काढले म्हणून पुढील अनर्थ टळला. ही माहिती मिळताच काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी युवकाला उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे. ही घटना दिनांक २८ जून मंगळवार रोजी सायंकाळी अंदाजे साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सोमवारी रात्री शेंदुर्णी परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने मजूर शेतात काम करीत होते. त्यात शेख रईस शेख अयूब हासुध्दा होता. त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना घडल्यापासून मालखेडा शिवारातील शेतकरी व मजूर वर्गामध्ये बिबट्या विषयी भिती निर्माण झाली आहे. म्हणून या मादि बिबट्याला धरुन दुसरीकडे सोडण्यात यावे अशी मागणी जोर धरत असली तरी बिबट्याला पिंजऱ्यात पकडून दुसरीकडे सोडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी लागते व जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी आम्हाला सुचना देणार नाहीत तोपर्यंत आम्ही बिबट्याला हलवू शकत नाही, अथवा जागा बदलवू शकत नाही परंतु ही हा प्राणी एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही म्हणून बिबट्याची मादी लवकरच या परिसरातून निघून जाईल अशी माहिती पाचोरा वनविभागाचे अधिकारी मा. श्री. हर्षद मुलांनी यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे एका बाजूला घटना घडलेल्या परिसरातील शेत शिवारात जास्तीत, जास्त बागायती शेती असल्याकारणाने याठिकाणी बिबट्याला राहाण्यासाठी व लपण्यासाठी मुबलक जागा असल्याने व बहूतेक या मादी बिबट्यासोबत तिची पिले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून ही बिबट्याची मादी या शेत शिवारातील परिसरातून लवकर बाहेर निघेल असे सध्यातरी वाटत नसल्याचा अंदाज जाणकार लोकांनी व्यक्त केला आहे.
तर दुसरीकडे सद्यस्थितीत पावसाळ्याला सुरुवात झाली असून शेती मशागत, पेरणी, बियाणे लागवड, बागायती शेतीत निंदनी, कोळपणी, खते किटकनाशके फवारणीची कामे करणे गरजेचे असल्याने तसेच याच रस्त्यावरून मालखेडा, अंबे वडगाव या गावातील हजाराचे जवळपास विद्यार्थी शेंदुर्णी येथील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी काही पायदळ तर काही सायकलीने ये, जा करतात तसेच दैनंदिन कामानिमित्त मालखेडा ते शेंदुर्णी रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते म्हणून या परिसरात बिबट्याचा वावर हा धोकादायक आहे.
याकरिता या परिसरातील सर्व नागरिकांनी या परिसरातून वावरतांना एकटे न जाता दोन किंवा तीन लोकांच्या समूहाने जावे व जातायेतांना सतर्कता बाळगावी असे आवाहन वनविभागातील अधिकारी मा. श्री. हर्षद मुलांनी व पोलीस उपविभागीय अधिकारी मा. श्री. भारतजी काकडे, पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे यांनी नागरिकांना या केले आहे.
घटनास्थळी वनपाल प्रकाश देवरे, वनरक्षक योगेश साळुंखे, प्रकाश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते सचिन कुमावत आदींनी घटनास्थळी भेट दिली.