कोरोनाची हॅलो टुन लागताच मोबाईल फोडला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०४/२०२१
एका तरुणाने अत्यावश्यक कामासाठी मदत मिळावी म्हणून तातडीने एका नातेवाईकाला फोन लावला व झाले ते विपरितच
अंबे वडगाव बसस्थानक परिसरात वडाच्या झाडाच्या सावलीत आसपास बरेचसे लोक बसलेले होते. पाचोरा ते जामनेर रस्त्यावरून मोटारसायकल ने जातांना एक तरुण व एक महिला हे बसस्थानक परिसरात थांबले व कुणालातरी फोन लावला परंतु फोन लावताच तिकडून कोरोना विषयावर माहिती देणारी टुन सुरु झाली. संबधीतांनी पहिल्या वेळेस फोन स्विकारला नाही. त्या तरुणाने पुन्हा प्रयत्न केला पुन्हा कोरोना विषयावर जनजागृती करणारी टुन सुरु झाली व बघतात तर काय संबधीत तरुणाने आपल्या हातातील अंदाजे दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल भररस्त्यावर आपटून मारला. मोबाईल डांबरीकरण असलेल्या रस्त्यावर आदळताच त्याचे तुकडे, तुकडे झाले.
सोबत असलेल्या तरुणीने हताश होऊन त्या मोबाईलचे तुकडे जमा करून त्या तरुणाकडे केविलवाणा चेहरा करुन पहात राहीली हे पाहून सदर तरुणाने मोबाईल का आदळला हा काही कठीण प्रसंगात आहे का ? म्हणून मदत करण्याच्या हेतूने चारपाच मुले त्याच्याजवळ जाऊन विचारपूस करु लागले तेव्हा खरा प्रकार समोर आला.
त्या तरुणाने आपली आपबिती कथन केली. या तरुणाचा कुणीतरी नातेवाईक कोरोनाची लागण झाली म्हणून दवाखान्यात आहे. दररोजच्या खर्चासाठी भरपूर पैसे लागत आहेत. म्हणून तो त्या नातेवाईकाला भेटण्यासाठी निघाला परंतु त्या आजारी नातेवाईकाला थोडीफार आर्थिक मदत करावी म्हणून हातात थोडेफार पैसे घेऊन जाण्याची इच्छा होती. कुणाकडून तरी उधार, उसनवार पैसे घेण्यासाठी हा तरुण संबंधीत पैसे वाल्यांना फोन करत होता.
या कठीण प्रसंगात एक एक सेकंद महत्त्वाचा असतांनाच कुणालाही फोन लावल्यास अगोदर कोरोनाची लागणारी ही हॅलो टुन त्याला लवकरात लवकर मदत मिळवण्यासाठी अडसर ठरत होती. तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस उभे होते.
त्या तरुणाच्या मते कोरोना हा भयंकर आजार आहे. याविषयी काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र आता आजारापेक्षा प्रचाराचा अतिरेक होतोय घरात टिव्ही सुरु केला तरी सर्व माध्यमांवर कोरोना, घरातून बाहेर निघताच ठिकठिकाणी समाजसेवक, समाजसुधारक यांची कोरोना विषयी अतिशयोक्ती करत सुरू असलेली जनजागृती, मुख्य रस्त्यावर लागलो की पोलिसांचा ससेमिरा, वृत्तपत्र हातात घेतले की वृत्तपत्रातून रकानेच्या रकाने कोरोनाच्या बातम्या थोडफार राहील ते कोरोनाच्या काळात कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे वापरा ते वापरा अश्या सततच्या जाहिराती, दवाखान्यात गेले तर रुग्णांची होणारी हेंडसाळ दवाखान्यात आकारले जाणारे वारेमाप बिल या सर्व गोष्टींचा मनावर होणारा मानसिक ताण व विपरीत परिणाम (त्यातल्या त्यात मोबाईल कंपनीच्या साततच्या हॅलो टुनच्या डोकेदुखी मुळे वैतागून माझ्याकडून मोबाईल फोडला गेल्याची खंत व्यक्त केली.)
ही परिस्थिती पाहील्यानंतर व सारासार विचार केल्यावर एकच सांगावेसे वाटते की मानवी जीवनात एक एक क्षण महत्त्वाचा असतांना मोबाईल कंपनीच्या या हॅलो टुनची खरच गरज आहे का ? म्हणून मरणारी माणसे कोरोनाने नाही तर मानसिक तान तनावाने जास्त मरतील.