वनविभागाचे अधिकारी उंटावरून शेळ्या चारत असल्याने बिबट्या मस्तावला.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०७/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर शिवारात मंगलाबाई नामदेव बडगुजर यांच्या मालकीच्या गट नंबर १००१/३/१ शेतातील त्यांच्याच मालकीच्या चार (बकऱ्या) शेळ्यांवर आज दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवत ठार केल्याची घटना घडली आहे.
ही घटना घडल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकरी दिपक नामदेव बडगुजर यांनी पाचोरा वनविभागाचे अधिकारी मा. श्री. मुलाने साहेब यांना भ्रमणध्वनीवर फोन करुन संपूर्ण घटनेची माहिती देऊन बिबट्या त्याच भागातील शेत शिवारात असल्याने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करुन बिबट्याचा बंदोबस्त व झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी मदत पाहिजे असल्याचे सांगितले असता संबंधित अधिकारी मुलाने यांनी संबंधित शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज करुन तक्रार करा मग आमची माणसे येतील व तपास करतील असे सांगितले हे उत्तर ऐकून संबंधित शेतकरी हतबल झाला असून या बिबट्याचा बंदोबस्त न झाल्यास एखादेवेळी शेतकरी किंवा शेतमजूरांच्या जीविताला धोका होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे.
वास्तविक पाहता संबंधित वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सत्यता पडताळून बिबट्याचा त्वरित बंदोबस तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला काय मदत करता येईल हे पहाणे गरजेचे असतांनाच ऑनलाईन अर्ज करण्याचा सल्ला देणे म्हणजेच (वनविभागाचे अधिकारी उंटावरून शेळ्या चारत असल्याने बिबट्या मस्तावला.) असे म्हणने आजतरी वावगे ठरणार नाही. कारण संबंधित घटनेबाबत सत्यजित न्यूज कडून मुलाने यांना भ्रमणध्वनीवर फोन करून घटनास्थळी जाणे गरजेचे आहे असे सुचवले होते मात्र मुलाने यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची भाषा कायम ठेवत अर्ज केल्यानंतर आम्ही घटनास्थळी जाऊ असे सांगितले आहे.