शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार :- नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे
कुडाळ
कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील माझा एकट्याचा विजय नसून सर्व शिक्षकांचा हा विजय आहे. माझ्यावर शिक्षकांनी दाखवलेला विश्वास निश्चितच सार्थकी लावेन. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासह संस्था चालकांचे अधिकार अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. शिक्षकांना हक्काची पेन्शन मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अधिक सोपा करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न राहतील. येत्या काळात प्रशासकीय पातळीवर कोणाचीही कामे प्रलंबित राहणार नसून सर्वांना योग्य न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे प्रतिपादन कोकण शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कुडाळ येथे सत्कार कार्यक्रमात केले. त्यांचा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघासह विविध संघटनेमार्फत यावेळी सत्कार करण्यात आला.
कोकण शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सत्कार सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने रविवारी कुडाळ येथील महालक्ष्मी हाॅलच्या सभागृहात करण्यात आला होता. यावेळी आ.म्हात्रे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव एम.जी.मातोंडकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सचिव गुरूदास कुसगावकर, डी.बी.पाटील शैक्षणिक विचार मंच व कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व्ही.जी.पोवार, आर.वाय.पाटील, जिल्हा अध्यापक संघाचे टि.के.पाटील, गुरूनाथ पेडणेकर, जिल्हा कास्ट्राईब संघटना अध्यक्ष आकाश तांबे, मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश म्हाडगुत, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र धावरे, भाजपा शिक्षक आघाडीचे सुरेश चौकेकर, कुडाळ तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष दिपक आळवे, कमलेश गोसावी, हनुमंत वाळके, माजी मुख्याध्यापक विवेकानंद बालम, शिक्षक सेवा अध्यक्ष निलेश गोसावी, विना अनुदानित शिक्षक संघटना अध्यक्ष सतीश तवटे, विजय मयेकर, सौ.खोत आदींसह जिल्हाभरातील मुख्याध्यापक संघ व विविध संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आ.म्हात्रे म्हणाले, आपण एक सर्वसामान्य मुख्याध्यापक असून कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत विजयी होऊन तुम्हा सर्वाचा आमदार झालो आहे. सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा मी आमदार आहे. फक्त कोकणचाच आमदार नव्हे तर संपूर्ण राज्यभरातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालकांचा आमदार असल्याचा सार्थ अभिमान आहे. या निवडणुकीत कोकणातील सर्व शिक्षक माझ्या पाठीशी राहीले प्रेम, विश्वास दिला आणि राज्यभरातील 33 संघटना, कोकणातील राजकीय नेतेमंडळी, हितचिंतक यांनी भक्कम पाठबळ दिले. माझ्या विजयासाठी जो जो घटक माझ्या पाठीशी उभा राहिला त्या सर्वाचे आपण आभार मानतो. प्रत्येक मुख्याध्यापक हा शिक्षकच असतो. या शिक्षकांनी एका शिक्षकाला मोठ्या विश्वासाने आमदार बनविले आहे, त्या विश्वासाला आपण बांधिल आहे. कोकणातील शिक्षकांनी मला दिलेले प्रेम, दाखवलेला विश्वास निश्चितच सार्थकी लावेन. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासह संस्था चालकांचे अधिकार अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. शिक्षकांना हक्काची पेन्शन मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करू, पण ती 100 टक्के मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. रखडलेले अनुदानही मिळवून दिले जाईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अधिक सोपा करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न राहतील. कोणालाही डावलून काम होणार नाही तर जे रास्त आहे, नियमात बसते, ती कामे करुन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांना सर्वांना न्याय मिळवून देण्याचे आपले प्रयत्न राहतील. शिक्षणातील सर्व प्रश्न दूर करून, शिक्षकांची भरती, विद्यार्थी पटसंख्या वाढ यावर भर दिला जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे जे प्रश्न आहेत ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांच्या माध्यमातून प्राधान्याने सोडविले जातील. त्यासाठी जिल्ह्यात लवकरच कार्यालय सुरू केले जाणार आहे.
दर दोन महिन्यांनी आपण जिल्ह्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शाळानिहाय दौरा करणार आहे. तसेच आपला आमदार फंडातील निधी हा शाळांच्या विकासासाठी देणार असल्याचे आ.म्हात्रे म्हणाले. आ.म्हात्रे यांना शिक्षणातील सर्व समस्यांचे ज्ञान आहे. आमदार म्हणून शिक्षकांचे प्रतिनिधित्व करीत असताना समग्र शिक्षणाचे प्रश्न ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करतील, असा विश्वास कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मातोंडकर यांनी यावेळी व्यक्त केला. श्री.तर्फे म्हणाले, आ.म्हात्रे यांच्या रूपाने प्रत्येक शिक्षक आमदार झाला आहे. या निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला आहे. आ.म्हात्रे यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शैक्षणिक दृष्ट्या कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ते जुनी पेन्शन योजना पुन्हा मिळवून देतील. दिनेश म्हाडगुत यांनी कोकण बोर्डाच्या धर्तीवर कोकणात स्वतंत्र क्रिडा विभाग व्हावा तसेच संच मान्यतेत क्रिडा शिक्षक पद समाविष्ट करण्यात यावे अशी विनंती केली. श्री.धावरे यांनी म्हात्रे यांच्या रूपाने शिक्षकांचे आमदार शिक्षकच बनले तसेच शिक्षणमंत्रीही शिक्षकच असले पाहिजे असे सांगितले. टि.के.पाटील म्हणाले, आ.म्हात्रे यांनी शिक्षक मतदार संघ निवडणूकीत इतिहास घडवला. तशाच प्रकारे चांगल्याप्रकारे शैक्षणिक कार्य करून ही आमदारकी कायम स्मरणात राहील असे कार्य करावे. पेन्शन हा आमचा हक्क आहे, ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. श्री.पेडणेकर म्हणाले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्था यांच्या अनेक समस्या आहेत, त्या सोडवून आ.म्हात्रे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवतील. व्हि.जी.पोवार, दिपक आळवे, दिनेश म्हाडगुत, श्री.शितोळे, कमलेश गोसावी, सुरेश चौकेकर, आकाश तांबे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक संघ,,मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब संघटना, भाजपा आघाडी, अध्यापक संघटना, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना, विनाअनुदानित शिक्षक संघटना व अन्य विविध संघटनेमार्फत आ.म्हात्रे यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. स्वागत जिल्हाध्यक्ष श्री.तर्फे, सुत्रसंचालन कसाल काॅलेजचे प्रा.निलेश महेंद्रकर यांनी केले तर आभार गुरूदास कुसगावकर यांनी मानले.