स्थानिक व परराज्यातील जेसीबी व्यावसायिकांमध्ये नवा वाद
कुडाळ-वेंगुर्ले तालुका जेसीबी मालक संघटनेने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले निवेदन
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थानिक व परराज्यातील जेसीबी व्यावसायिकांमध्ये नवा वाद निर्माण झाला असून याबाबत जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
परराज्यातून तसेच अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या जेसीबी व्यावसायिकांमुळे स्थानिक जेसीबी व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. याबाबत आज कुडाळ-वेंगुर्ले तालुका जेसीबी मालक संघटनेने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग यांची भेट घेतली. बाहेरील जेसीबीधारक आपल्या तालुक्यात येऊन काम करतात. त्यामुळे आपल्या स्थानिकांचा रोजगार कमी झाला आहे. ही समस्या निवारण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे, यासाठीचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग यांना देण्यात आले. तसेच याबाबतची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, कुडाळ तहसीलदार आणि वेंगुर्ले तहसीलदार यांना देण्यात आली.
या निवेदनातून कुडाळ-वेंगुर्ले तालुका जेसीबी मालक संघटनेने आपल्या व्यथा मांडताना म्हटले आहे की, सद्यस्थितीत सुशिक्षित बेरोजगार लोकांना नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. उद्योगधंद्यांकडे वळा; नोकरी मिळण्याची अपेक्षा न ठेवता नोकऱ्या देणारे बना !, या सरकारी धोरणानुसार आम्ही क्षमता नसतानाही कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी बँक कर्ज घेऊन जेसीबी मशीन खरेदी करून धाडसाने धंद्याकडे वळले आहोत. नवीन जेसीबी खरेदी किंमत सुमारे ३३ ते ३४ लाख रुपये असून बँक दरमहा हफ्ता ६० हजार रुपये आणि टॅक्स बसतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जेसीबी धंदा वर्षात फक्त पाच ते सहा महिन्यात चालू असतो. इतर पावसाळी महिन्यात जेसीबी उभा ठेवलेला राहतो. अलीकडच्या काळात कुडाळ-वेंगुर्ले परिसरात लगतच्या इतर राज्यातून आणि जिल्ह्यात बरेच जेसीबी आणि ट्रॅक्टर राजरोसपणे येऊन कमीत कमी दरात करतात. हे येथील स्थानिक जेसीबी व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरत असल्याचे आपल्या निवेदनात म्हटले आहे.