अनधिकृत वाळू व्यावसायिकांच्या विरोधात महसूलची कठोर पावले
नेरुरपार येथे केली वाळुने भरलेली होडी जप्त
कुडाळ
नेरूरपार येथील कर्ली नदीच्या पात्रामध्ये अवैद्यरित्या वाळू उपसा करणारी होडी महसूल पथकाने पकडली असून या होडीमध्ये अनधिकृत रित्या वाळूचासाठा आढळून आला आहे. याबाबत दंडात्मक कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयात अहवाल पाठवण्यात आला आहे. अनधिकृत वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाने कठोर पावले उचलली आहे.
अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर व्यावसायिकांकडून महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुडाळ येथे मारहाण झाल्यानंतर महसूल विभागाने अनधिकृत वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. याबाबत चेंदवन तलाठी सोनवणे यांनी नेरुरपार येथील कर्ली नदीपात्रा जवळील सर्वे नंबर ५७/१० मध्ये छापा टाकला असता वाळू ने भरलेली होडी दिसून आली ही मिळकत रघुनाथ परब यांच्या नावे असून सदर होडी मधील वाळू व होडी मालक याबाबत परप्रांतीय मजुरांकडे त्यांनी चौकशी केली असता ही होडी योगेश नाईक यांच्या मालकीची असल्याचे त्यांनी सांगितले या होडीमध्ये सुमारे २ ब्रास वाळू साठ्याबाबत कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले याचा पंचनामा करण्यात आला तसेच ही होडी जप्त करण्यात आली. याबाबत पुढील कारवाईसाठी आणि दंडात्मक कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयाला अहवाल पाठवण्यात आला आहे.