दे दान तर सुटे गिऱ्हाण, पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत घोडेबाजार, बरेचसे मतदाते पैश्याच्या प्रतीक्षेत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०१/२०२१
आज दिनांक १५ जानेवारी शुक्रवारी पाचोरा तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मतदान होत असून सगळीकडे सकाळी साडेसात वाजेपासून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी रांगा लागल्याचे दिसून येत होते.
जो तो पॅनल प्रमुख व उमेदवार गावातील गल्लीबोळात फिरून ताई, माई, आक्का, भाऊ, तात्या, जिभाऊ यांना मतदान करायला चला म्हणून सांगत होते.
यात निष्ठावंत मतदारांनी कोणत्याही आमिषाला व प्रलोभनांना बळी न पडता स्वयंस्फूर्तीने मतदानाचा हक्क बजावला असलातरी रात्री बऱ्याच गावागावात मते मिळवण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन व रोख रक्कम वाटल्याची जोरदार चर्चा संपूर्ण तालुक्यातील जनतेतून ऐकावयास मिळत आहे.
नेमके याच प्रकारामुळे आपल्याकडेही एखादा उमेदवार येईल व आपले चांगभले होईल या आशेवर हातावर हात ठेवून वरेचसे मतदाते अजूनही मतदान करण्यासाठी गेलेले नसल्यामुळे दुपारी अडीच वाजेपर्यंत अपेक्षित मतदानाची आकडेवारी व टक्केवारी समाधानकारक नसल्याचे चित्र होते.
मात्र पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द, कळमसरा व लोहारा गावात पाचोरा व जामनेर तालुक्याच्या आमदारांची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी काट्याची लढत दिसून येत आहे.
तसेच शिंदाड, वरखेडी, भोकरी, पिंपळगाव हरेश्वर, कडे वडगाव, डोंगरी सातगाव, लोहारी या मोठ्या लोकसंखेच्या गावातून एक बाय तिन म्हणजे भाजपा एका बाजुला तर शिवसेना, राष्ट्रीय कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसऱ्या बाजूला अशी लढत रंगली असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
मतदान करण्यासाठी दुपारनंतर चार वाजेपासून गर्दी उसळण्याची शक्यता असून
कायदासुव्यवस्था राखणे कामी डी.वाय.एस.पी.ईश्वरजी कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निताजी कायटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
तरीही लोहारा, कुऱ्हाड, शिंदाड, भोकरी, डोंगरी सातगाव, कोल्हे या गावांकडे जातीने लक्ष देण्याची गरज असून काही ठीकाणी लोकप्रतिनिधी व निवडणुकीत उभे असलेले उमेदवार हे मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतांना दिसून येत होते.
तरीही पाचोरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान शांततेत पार पडेल अशी आशा बाळगूया
(जे जे होईल ते ते पहा, तुका म्हणे उगे रहा.)