पाचोरा तालुक्यातील रेशनिंगच्या तांदळाची एका खाजगी गोदामात साठवणूक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०३/२०२४
पाचोरा तालुक्यासह भडगाव, जामनेर तालुक्यात रेशनिंगचा तांदूळ मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात जात असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच रेशनिंगच्या तांदूळाची खुल्या बाजारात खरेदी, विक्री होत असल्याची तक्रार पाचोरा तालुक्यातील भोजे येथील समाजसेवक मा. श्री. निलेश उभाळे यांनी मा. तहसीलदार पाचोरा यांच्याकडे केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात गोरगरिबांसाठी येणारे रशनिंगचे धान्य वाटप करतांना मोठ्या प्रमाणात घोळ सुरु आहे. तसेच याच सोबत मोठ्या प्रमाणात हा तांदूळ काळ्या बाजारात जात असल्याची माहिती समोर येत असून याबाबत वारंवार वृत्त प्रकाशित करुनही पुरवठा व संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी डोळेझाक करत असल्याने आता या रेशनिंग माफियांची हिंमत वाढली असून तांदूळाची हेराफेरी करुन गोरगरिबांच्या पदरात धान्य न टाकता ते धान्य दुसरीकडे विक्री केले जात आहे.
हा काळ्या बाजारात जाणारा तांदूळ पाचोरा तालुक्यातील एका गोदामात उतरवतांंनाची चित्रफीत व काही फोटो सत्यजित न्यूज हाती लागले असल्याने या गैरप्रकाराबाबत सखोल माहिती जाणून घेत या तांदूळ माफियांचा भांडाफोड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी याकरिता पाठपुरावा केला जाणार आहे.
महत्वाचे~ रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सत्यजित न्यूज कडून मागील दोन वर्षांपासून सतत प्रयत्न सुरु आहेत. यामुळे या धान्य माफियांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विशेष म्हणजे मागील दोन दिवसांपासून अंबे वडगाव येथील दिलीप जैन यांच्या घरासमोरुन काही अनोळखी व्यक्ती सतत फिरत आहेत यामुळे हे अनोळखी व्यक्ती कोण आहेत याबाबत लवकरच चौकशी करुन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात येणार आहे.