कुऱ्हाड खुर्द येथील एक बहुचर्चित कृषी केंद्राचा परवाना रद्दबातल करण्यासाठी लवकरच तक्रार दाखल होण्याची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०७/२०२३
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील एक कृषी केंद्र मागील काही वर्षांपासून विविध विषयांवर गाजत असून मागील काळात याच कृषी केंद्रातून नकली युरीया व पोटॅश खताची विक्री करण्यात आली होती. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली होती. गावातील हितसंबंध असल्याकारणाने कुऱ्हाड खुर्द ग्रामस्थांनी सामंजस्य दाखवून संबंधित कृषी केंद्राच्या व्यवस्थापकाला समज देऊन केलेल्या पापावर पांघरुण घातले होते.
परंतु याच हित संबंधांचा व गावकऱ्यांच्या चांगल्या वागणूकीचा फायदा घेत (कुत्र्याची शेपटी कितीही नळ्यात घातली तरी ती वाकडीच रहाते) या म्हणी प्रमाणे या लालची कृषी केंद्राच्या व्यवस्थाकाने यावर्षीही कमी वेळात जास्त पैसा कमावण्याच्या नादात सरदार कंपनीचे सुपर फॉस्फेट हे खत विक्री करुन अजून शेतकऱ्यांना फसवले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या सरदार कंपनीचे सुपर फॉस्फेट ज्या, ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या कापूस पिकाला दिले आहे. त्या, त्या शेतकऱ्यांचे टवटवीत असलेले कापूस पीक कोमेजून सुकत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून आता सर्व शेतकरी संघटित होऊन पाचोराचे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचे कुऱ्हाड खुर्द गावातून ऐकायला मिळत आहे.