वक्रतुंड सॉ मिल वर वनविभागाचा वरदहस्त, लाकुड वाहतूक केली जाते बिनधास्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०३/२०२४
सद्यस्थितीत पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनच्या पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून दररोज विनापरवानगी मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन चिंचपूरा येथील समाजसेवक व निसर्गप्रेमी मा. श्री. निलेश उभाळे यांनी वृक्षतोड थांबवून अनाधिकृतपणे लाकुड खरेदी करुन त्याची विल्हेवाट लावणाऱ्या सॉ मिल वर कारवाईची मागणी केली होती व आजही कारवाई करण्यात यावी अशी मागणी कायम आहे.
असे असल्यावरही एका बाजूला तक्रारीत नमूद केलेल्या वक्रतुंड सॉ मिल वर वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे तर दुसरीकडे सॉ मालकाने विरप्पनलाही मागे टाकून कायदा धाब्यावर बसवून आजही मोठ्या प्रमाणात लाकुड खरेदी व लाकुड कटाई सुरु असल्याचे उघडकीस आले असून जनतेच्या व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करत सॉ मिलच्या परिसरातील तसेच नवीन लाकुड खरेदी करुन ते लाकूड भोजे शिवारातील कानाकोपऱ्यात टाकून लाकडाचा साठा करत आहे यामुळे एका बाजूला कारवाईचा दंडा तर दुसरीकडे लाकुड खरेदी व कटाईचा फंडा सुरु आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
विशेष म्हणजे आज दिनांक १३ मार्च २०२४ बुधवार रोजी समाजसेवक व निसर्गप्रेमी मा. श्री. निलेश उभाळे हे काही कामानिमित्त भोजे परिसरात फिरत असतांना त्यांना भोजे शिवारातील एका शेतात मोठ्या प्रमाणात लाकुड साठा पडलेला आहे अशी माहिती छायाचित्रासह मिळाली होती. अवैध लाकुड साठ्यावर कारवाई करण्यासाठी रितसर वनविभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कळवणे क्रमप्राप्त होते मात्र मागील दोन वर्षांपासून वनविभागाकडे वारंवार तक्रारी करुनही काहीएक फायदा होत नसल्याने निलेश उभाळे यांना ही माहिती मिळताच त्यांनी ११२ नंबरवर फोन या अवैध लाकुड साठ्यावर संबंधित विभागाकडून रितसर कारवाई करण्यासाठी मागणी केली होती ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
११२ नंबरवर फोन करताच पोलीस यंत्रणेमार्फत संबंधित वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य सुचना देऊन कारवाई करण्यासाठी सांगितले असल्याचे तक्रारदार मा. श्री. निलेश उभाळे यांनी सत्यजित न्यूज कडे सांगितले आहे.
******************************************
समाजसेवक व निसर्गप्रेमी मा. श्री. निलेश उभाळे
******************************************
वक्रतुंड सॉ मिलची सखोल चौकशी करुन पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यातील होणारी वृक्षतोड कायमस्वरूपी न थांबल्यास निसर्गाच्या व वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार.
मी निसर्ग संपदा व वन्यजीव संरक्षणासाठी बेसुमार होणारी वृक्षतोड थांबवून वक्रतुंड सॉ मिलवर रितसर कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन संबंधित विभागाकडून कारवाई करण्यात आली मात्र वक्रतुंड सॉ मिलची सखोल चौकशी करतांना तक्रारदाराला विश्वासात घेऊन व त्यांच्या समोर सॉ मिलची चौकशी करण्यात आली नसल्याने मत व्यक्त करत या चौकशीत पाचोरा व जळगाव येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सॉ मिलच्या मालकाशी हातमिळवणी करुन थातुरमातुर चौकशी करुन हात ओले करुन घेतल्याचा आरोप मा. श्री. निलेश उभाळे यांनी केला आहे.
कारण की मा. श्री. निलेश उभाळे यांनी भोजे येथील वक्रतुंड सॉ मिलच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली तेव्हा अवैधरित्या वृक्षतोड करुन एक ट्रक मध्ये १८.०९ घन मीटर तसेच पंधरा ट्रक ओले २५० घन मीटर बेकायदेशीर लाकुड साठा आढळून आला असला तरी हे मोजमाप करतांना तक्रारदार, गावातील पोलीस पाटील किंवा सुज्ञ नागरिकांच्या समोर रितसर पंचनामा होणे गरजेचे होते परंतु असे न करता सॉ मिलच्या मालकाशी हात मिळवणी करुन वनविभागाच्या साक्षीने झालेल्या बेसुमार अवैध वृक्षतोडीवर पांघरुण घालून स्वताचे व सॉ मिलच्या मालकाचे पाप झाकण्यासाठी प्रयत्न केला आहे असे मत व्यक्त करत संबंधित अधिकारी व कर्मचारी तसेच सॉ मिलचे मालक व लाकुड व्यापारी यांच्या भ्रमणध्वनीचा तपशील काढून कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.