भोकरी येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/११/२०२३
पाचोरा तालुक्यातील वरखेडी व भोकरी येथील स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांसाठी मिळणाऱ्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार केला जात असून हा अनागोंदी व भोगळ कारभार त्वरित थांबवण्यात यावा तसेच भोकरी येथील शासनमान्य स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पाचोराचे प्रांताधिकारी मा. श्री. भुषणजी अहिरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वरखेडी व भोकरी येथील शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून मोठ्या प्रमाणात काळाबाजार केला जात असून महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रतिव्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ देणे बंधनकारक असल्यावरही हे शासनाच्या नियमांना बगल देत कमी प्रमाणात धान्य वाटप करतात. तसेच ज्या, ज्रेया शनकार्ड धारक लाभार्थ्यांना ३५ किलो धान्य मिळते त्यांना धान्य वाटप करतांना ३५ किलो ऐवजी फक्त आणि फक्त २५ किलो धान्य देण्यात येते व ज्या रेशनकार्ड धारकांना २५ किलो धान्य वाटप केले पाहिजे अशा रेशनकार्ड धारकांना फक्त आणि फक्त १५ ते २० किलो धान्य पुरवठा केला जातो व हे धान्य धनदांडग्या व श्रीमंत लोकांच्या गुराढोरांच्या दाणासाठी गोण्याच्या, गोण्या काळ्या बाजारात विकल्या जातात असा आरोप वंचित बहुजन आघाडीने मा. प्रांताधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.
तसेच स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप करत असतांना काही रेशनकार्ड धारकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रफीती तयार केली असून या चित्रफितीमध्ये संबंधित स्वस्त धान्य दुकानदार रेशनकार्ड धारकांना धान्य वाटप करतांना ई पॉश मशीनवर अंगठा ठेवून धान्य वाटप करतात तेव्हा ई पॉश मशीन मधून ३५ किलो धान्यांची पावती निघते प्रत्यक्षात मात्र ३५ किलो ऐवजी २५ किलोच धान्यच देतात व पावती दिली जात नाही असा आरोप करत आमच्याकडे पक्का पुरावा असल्याचा दावा क्रारदारांनी केला आहे व तशी चित्रफीती संबंधित अधिकाऱ्यांना दाखवण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.
तसेच वरखेडी व भोकरी येथील स्वस्त धान्य दुकानात कोणत्याही प्रकारचे माहिती फलक लावण्यात आले नसल्याने संबंधित स्वस्त धान्य दुकान कुणाच्या नावावर आहे, दुकानाचा चालक कोण आहे, महिन्याला किती धान्य आले, किती धान्य वाटप करण्यात आले, एकुण रेशनकार्ड लाभधारक किती, शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रती व्यक्ती गहू, तांदूळाचे प्रमाण किती, दुकानाची वेळ, सेल्समन व मापाड्यांची नावे, भाव फलक लावण्यात आले नसल्याने तसेच तक्रार पुस्तीका नसल्याने रेशनकार्ड धारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच वरील विषयास अनुसरुन काही माहिती विचारल्यावर संबंधित रेशन दुकानदार अरेरावीची भाषा वापरुन तुमच्याकडून जे होईल ते करा असे सांगून आम्हाला दुकानातून हाकलून लावतात अश्या तक्रारींचे निवेदन वरखेडी व भोकरी ग्रामस्थांनी वंचित बहुजन आघाडीकडे देऊन भोकरी येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे पाचोरा तालुकाध्यक्ष विशाल बागुल, सचिव दिपक परदेशी, प्रसिद्धी प्रमुख आकाश पवार, एजाज पिंजारी व पदाधिकाऱ्यांनी मा. प्रांताधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देऊन वरखेडी व भोकरी येथील स्वस्त धान्य दुकानांची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी तसेच भोकरी येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना त्वरित रद्द करावा अशी मागणी केली असून त्वरित अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.