गिरणाई शिक्षण संस्थेच्या कुमारांना ‘पोक्सो’ कायद्याविषयक मार्गदर्शन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०७/२०२३
सद्यस्थितीत टि. व्ही. मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा लहान, लहान मुले व मुली सर्रासपणे वापर करत असून या माध्यमातून काही वेबसाईट व काही यूट्यूबच्या माध्यमातून नको ते संदेश व नको त्या चित्रफिती या बालवयातील मुला मुलींच्या समोर येत असल्याने याचे आकर्षण वाढून या बालवयातील मुला, मुलींना याच्या दुष्परिणामांची महिती नसल्याने आज बरेचशी अल्पवयीन मुले व मुली यात गुरफटले जात असल्याने
दररोज बऱ्याचशा घटनांमध्ये अल्पवयीन मुले व मुली शिकार होत आहेत. यातुनच बालवयातच नको त्या प्रसंगला सामोरे जावे लागते.
याची दखल घेत अल्पवयीन मुला, मुलींना याबाबत योग्य वेळी योग्य माहिती देऊन त्याचे दुष्परिणाम समजून सांगितल्यास अशा घटना घडणार नाहीत. म्हणून पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्थेच्या कुमारांना ‘पोक्सो’ कायद्याविषयक मार्गदर्शन व्हावे यासाठी पाचोरा येथील तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ जुलै २०२३ शनिवार रोजी शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे न्यायाधीश मा. श्री. जी. बी. औंधकर यांच्या अध्यक्षतेखाली गिरणाई शिक्षण संस्था संचलित विविध शाळांमधील कुमारवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना पोस्को (POCSO) कायदा संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या मार्गदर्शन शिबिराच्या सुरवातीला गिरणाई शिक्षण संस्थेतर्फे उपस्थित न्यायमूर्तींना फुल झाडांची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले. या मार्गदर्शन शिबिरात “मोफत कायदा सहायता” या विषयी जेष्ठ विधिज्ञ मा. जे. डी. दादा काटकर यांनी मार्गदर्शन केले. शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती सविता पाटील यांनी बालकांचे हक्क व अधिकार या विषयी तर न्यायाधीश सौ. एम. जी हिवराळे मॅडम यांनी पोक्सो कायदा इतिहास/ ऑब्जेक्ट्स/ प्रियंबल विषयी सखोल मार्गदर्शन केले. मा. सौ. ॲड. भाग्यश्री महाजन यांनी (POCSO) पोस्को कायद्यातील तरतुदी तसेच सौ. एम. डी. जाधव मॅडम यांनी सध्याची समाज व्यवस्था व (POCSO) कायद्याविषयी वस्तुस्थितीदर्शक आढावा सादर केला.