ध्वजाचा सन्मान न राखल्याने कुऱ्हाड येथे रास्ता रोको, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~१७/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे ध्वजाचा सन्मान न राखल्याने कुऱ्हाड येथे रास्ता रोको करत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन दिवसांपूर्वी कार्यक्रमानिमित्त कुऱ्हाड खुर्द येथील बसस्थानक परिसरात ध्वज लावण्यात आले होते. परंतु या लावण्यात आलेल्या ध्वजाचा सन्मान न राखला गेल्याच्या कारणावरून शनिवार रोजी कुऱ्हाड खुर्द गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन संबंधित आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महिला, पुरुष व लहान मुलांनी पाचोरा-लोहारा रस्ता अडवून सुमारे चार तास रस्ता रोको करत आरोपीला समोर आणत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भुमिका घेत सुमारे चार तास रास्तारोको करण्यात आल्यामुळे या परिसरात एकच गर्दी झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय अधिकारी मा. श्री. भरतजी काकडे, पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मा. श्री. रणजित पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार आयुष्यमान प्रविणजी ब्राम्हणे यांनी घटनास्थळी येत जमलेल्या समुदायाला शांतता राखण्यासाठी आवाहन केले व परिस्थिती समजून घेतली.
आंदोलकांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध रितसर गुन्हा नोंद करण्यात आला असून येत्या दोन दिवसात आरोपीला अटक करुन कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पाचोरा उपविभागीय अधिकारी मा. श्री. भरतजी काकडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून अशा समाजकंटक आरोपींविरुद्ध कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी कुऱ्हाड गावपरिसातील जनतेतून होत आहे.