पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी केली वॉश आऊट मोहीम सुरु.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०३/२०२४
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यांबाबत माहिती जाणून घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २४ मार्च २०२४ रविवार रोजी धाडसत्र राबवून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदाड गावाजवळील निमखेडी रस्त्यालगत असलेल्या नाल्यात तसेच पिंप्री धरणाजवळील झाडाझुडुपांमध्ये गावठी दारु गाळण्याच्या उद्देशाने टाकलेला कच्चा माल (रसायन) नष्ट केला आहे.
यात शिंदाड येथील हमीद लतिफ तडवी, सुपडू सिकंदर तडवी पिरखा बाबुलाल तडवी यांची ९५०००/०० रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची तयार दारु तसेच १९०० लिटर गावठी हातभट्टीची दारु निर्मितीसाठी लागणारे कच्चे, पक्के रसायन व दारु निर्मितीसाठी लागणारे साहित्य ताब्यात घेत नष्ट करुन संबंधित आरोपींच्या विरोधात दारुबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती लागले असून या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित निकम, संदिप राजपूत, प्रशांत पाटील, अमोल पाटील, योगेश भिलखेडे यांचा समावेश होता.
महत्वाचे ~
शिंदाड येथील गावठी दारुची निर्मिती व विक्री ही आसपासच्या दहा खेड्यापाड्यातील लोकांची डोकेदुखी ठरत होती. कारण शिंदाड येथून अंबे वडगाव, अंबे वडगाव तांडा नंबर एक व दोन, वरखेडी, लोहारी, पिंपळगाव हरेश्वर, कडे वडगाव व शिंदाड येथील किरकोळ विक्रेत्यांना दारुचा पुरवठा केला जात होता. आज कारवाई करण्यात आल्याने सर्वसामान्य जनता व सुज्ञ नागरिकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे आभार मानले आहेत. मात्र या कारवाईत सातत्य ठेऊन शिंदाड येथील गावठी दारुची निर्मिती व विक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कडक कारवाई करावी तसेच अशीच कारवाई लोहारा, कुऱ्हाड अंबे वडगाव, वरखेडी, लोहारी, कोल्हे व इतर गावात करुन
दारु व्यवसायातील अट्टल आरोपींना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली जात आहे.