वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हाताला सुटते खाज, वृक्षतोड थांबवण्यासाठी बातमी लिहितांना आता आम्हालाही वाटते लाज.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०३/२०२३

(ज्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज नसेल किंवा ज्यांना दवाखान्यात
ऑक्सिजन शिवाय रुग्णांचे होणारे मृत्यू दिसत नसतील त्यांनी ही बातमी फॉरवर्ड करु नये)

पाचोरा, भडगाव, जामनेर तसेच मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात विरप्पनच्या पिल्लावळीने तसेच लाकुड व्यवसायातील दलालांनी धुमाकूळ घातला असून स्वयंचलित यंत्राच्या साह्याने दररोज शेकडो नव्हे तर हजारो हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल व ट्रॅक्टर मधुन लाकडाची वाहतूक केली जात आहे.

ही होणारी अवैध वृक्षतोड थांबवण्यासाठी पाचोरा, भडगाव व सोयगाव तालुक्यातील निसर्गप्रेमींनी मा. प्रांताधिकारी, मा. तहसीलदार तसेच संबंधित तालुक्यातील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे भ्रमणध्वनीवर तर कधी प्रत्यक्ष भेटून लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र संबंधित वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आजपर्यंत कुठलीही ठोस कारवाई केली नसल्याने वनविभागाचे अधिकारी व तसेच लाकुड व्यापारी यांच्यात अर्थपूर्ण मैत्रीचे घट्ट असे नातेसंबंध तयार झाल्याचा आरोप निसर्गप्रेमी व सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे.

याबाबत एका सुज्ञ नागरिकांने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी की लाकुड व्यापारी, लाकुड वखारीचे मालक व यांच्यातील दलाल यांची साखळी निर्माण झाली असून वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झिरो तसेच लाकुड व्यापाऱ्यांचे दलालांच्या मार्फत महिन्याकाठी ठराविक रक्कम घेऊन थोडक्यात सांगायचे झाले तर (हप्ते) घेऊन या अवैध वृक्षतोडीला मुक संमती दिली असल्याने हि अवैध वृक्षतोड दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरु असल्याचे सांगत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनीचे कॉल डिटेल्स काढले तर लगेच दुध का दुध व पाणी का पाणी होईल असे ठामपणे सांगितले.

एका बाजूला नवनविन मोठ, मोठे प्रकल्प, कारखाने, रस्तांचे विस्तारीकरण, दररोज हजारो एकर शेत जमीनीचे बिगर शेतीत होणारे रुपांतर व त्या जागेवर उभी राहणारी सिमेंटची जंगलं, कोटींच्या संखेने रस्त्यावर धावणाऱ्या स्वयंचलित वाहनातून सोडला जाणिरा कार्बनडाय ऑक्साइड तर दुसरीकडे पाचोरा तालुक्यातील राखीव जंगलासह खाजगी शेत शिवारातील निसर्ग संपत्तीचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. तर दुसरीकडे पाचोरा तालुक्यातील भोजे व जामनेर तालुक्यातील वाकोद येथे दोन नवीन लाकुड वखारी सुरु करण्यात आल्या आहेत. या वर लाकुड वखारी दुसरीकडे बंद झाल्या होत्या व त्या पाचोरा व जामनेर तालुक्यात स्थलांतरित करुन लाकुड वखार व आरा मशीनचा व्यवसाय जोमाने सुरु करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

अशीच अवैध वृक्षतोड सुरु राहिल्यास भविष्यात मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागणार असल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त करत अवैध वृक्षतोड थांबवण्यासाठी जनचळवळ उभारली गेली पाहिजे व अवैध वृक्षतोड करणाऱ्या व्यापाऱ्यांसह संबंधित शेत मालक, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच त्या, त्या सजेच्या तलाठी व महसूल विभागाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.