आत्मनिर्भर भारत’ हे नरेंद्र मोदींचे महत्त्वाचे पाऊल , आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केले कौतुक
वॉशिंग्टन,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ हे अभियान महत्त्वाचे पाऊल आहे, अशी स्तुती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) गुरुवारी केली.
कोरोना महामारीनंतर आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देण्यात आलेल्या आर्थिक प्रोत्साहनामुळे भारतीय अर्थव्यवस्था सावरण्यास मदत झाली आहे तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात धोका टळला. त्यामुळे हा पुढाकार आम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण वाटतो, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संप्रेषण विभागाचे संचालक गॅरी राईस यांनी दर पंधरवड्यात होणार्या पत्रकार परिषदेत सांगितले.
जागतिक अर्थव्यवस्थेत भारत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडेल. यासाठी महत्त्वाच्या असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तयार करण्यात आलेल्या धोरणांतर्गत कार्यक्षमता आणि स्पर्धा वाढवली जाईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याचे त्यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानाबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
भारतातील ‘मेक फॉर द वर्ल्ड’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानासह जागतिक मूल्य साखळीत आणखी सहभाग वाढवण्यासाठी भारताला याबाबतच्या धोरणावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आरोग्याशी निगडित सातत्यपूर्ण विकासाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारताला आरोग्य क्षेत्रातील एकूण खर्च वाढवावा लागणार आहे. सध्या हा खर्च सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3.7 टक्के असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नीती आयोग आणि अर्थमंत्रालयासोबत केलेल्या अभ्यासात समोर आले, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.