भोकरी गावात नळांना दुषित पाणी, ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०२/२०२४
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावात नळांना दुषित पाणी पुरवठा केला जात असल्याने भोकरी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दुसरीकडून पाणी आणून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागते आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावाला बिल्धी धरणातून पाणीपुरवठा केला जातो परंतु मागील आठवड्यापासून भोकरी गावातील काही भागामध्ये व काही रहिवाश्यांच्या नळांना अत्यंत दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने भोकरी गावातील त्रस्त नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे. कारण भोकरी गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कारण दुषित पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने तसेच हे पाणी पिण्यासाठी वापरले तर अनेक आजारांना आमंत्रण दिल्यासारखे होईल म्हणून ज्या ग्रामस्थांच्या नळांना दुषित पाणी येत आहे त्यांना आसपासच्या विहिरीतील पाणी आणून वेळ काढावी लागत आहे.
याबाबत संबंधित ग्रामसेवकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता नळांना दुषित पाणी येत आहे हे मान्य करत आम्ही लवकरच यावर उपाययोजना करणार आहोत असे सांगितले आहे. परंतु ग्रामसेवक हे नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित रहात नसून पंधरा, पंधरा दिवस ग्रामसेवकांचे दर्शन होत नसल्याचे भोकरी ग्रामस्थाचे म्हणणे आहे.