पाचोरा तालुक्याला तहसीलदार व पाचोरा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक मिळेनात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०२/२०२४
पाचोराचे तहसीलदार मा. श्री. चव्हाण के साहेबांची बदली झाल्यापासून त्यांच्या जागेवर आजपावेतो नवीन तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली नसल्याने तहसीलदार यांच्या अखत्यारीत येणारी सर्व कामे खोळंबली असून बरीचशी कामे रामभरोसे सुरु आहेत. पाचोरा तालुक्याचे तहसीलदार पद रिक्त असल्याकारणाने वाळू माफिया, विरप्पनची पिल्लावळ तसेच पुरवठा विभागात अनागोंदी कारभार सुरु असल्याने रेशन माफिया मस्तावले आहेत. अशा बऱ्याचशा विभागात अनागोंदी कारभार सुरु असून मनमानी कारभार करुन ते मस्तावले आहेत.
विशेष म्हणजे तलाठ्यांनी केलेल्या कामावर देखरेख करणे, जमिनीच्या नोंदी, खरेदी, विक्री संबंधित अनेक प्रकारचे कामे, शेतकऱ्यांना जमिनीची माहिती मिळण्यास अडचण येऊ लागली आहे. जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे तहसीलदारांच्या स्वाक्षरीने वैध ठरतात तसेच पीक संबंधित कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी तसेच यावर्षी कमी पाऊस झाल्याने भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यातील धरण, तलाव व इतर सार्वजनिक जलसाठ्यातून होत असलेली बेसुमार पाणी चोरी थांबवण्यासाठी कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने भविष्य भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच इतर न्यायिक कामे अडकून पडली आहेत. भविष्य येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांना मार्गदर्शन करणे, तसेच तहसीलदार नसल्याने तालुक्यातील कार्याचा अहवाल प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळेवर सादर करण्यात खंड पडला आहे का हे बघणे महत्वाचे आहे.
तसेच पाचोरा हे तालुक्याचे शहर असून या तालुक्याचा व शहराचा भौगोलिक परिसर मोठा असल्याकारणाने या तालुक्याची व पाचोरा शहराची कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे अश्या पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ यांची बदली झाली असून अद्याप पावेतो त्यांच्या रिक्त जागेवर नव्याने पोलीस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. असे असले तरीही पाचोरा पोलीस स्टेशनला असलेले राहुलजी खताळ यांनी त्यांच्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्था चोख ठेवली होती. मात्र त्यांची बदली झाल्यापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी चांगल्याप्रकारे कामकाज सांभाळत आहेत. मात्र तरीही वरिष्ठ अधिकारी नसल्याने त्यांना त्यांच्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाची उणीव भासत असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची बदली झाल्यापासून बरेचसे दिवस उलटले तरीही नव्याने येणारे पोलीस निरीक्षक अद्याप हजर झाले नसल्याचे पाहून वाळु माफिया, गौण खनिज माफिया, अवैध धंदे करणारे यांची चुळबुळ सुरु झाली असून ते बाळाच्या बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भविष्यात येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन आता राजकीय मंडळी मेळावे घेत असून या मेळाव्याला चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी तसेच मराठा आंदोलनाला अद्यापही पाहिजे असे यश मिळाले नसल्याने मराठा बांधव न्याय, हक्कासाठी केव्हाही रस्त्यावर येऊ शकतात, तसेच इतर मोर्चे, आंदोलन, सन उत्सव, यात्रा उत्सवात बंदोबस्त करणे कामी पोलीस निरीक्षकांची अत्यंत गरज आहे. म्हणून लवकरात लवकर पाचोरा पोलीस स्टेशनला नवीन पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.