कळमसरा शिवारात विहिरीत आढळला मृत अवस्थेत बिबट्या.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील कळमसरा शिवारात म्हसाळे परिसरात श्री. दयाराम तुळशीराम चौधरी. (तेली) यांच्या मालकीच्या शेतातील विहीरीत बिबट्या पडलेला आहे अशी माहिती मिळाली असता कळमसरा येथील निसर्गस्नेही मा.श्री. दत्तात्रय तावडे यांनी दिनांक ३१ जानेवारी सोमवारी सकाळी सात वाजता शेतात जाऊन खात्री केली असता सदर विहिरीत पहिले असता बिबट्या मृत अवस्थेत पाण्यावर तरंगत असल्याच्या परिस्थितीत आढळून आला. म्हणून मा.श्री. दत्तात्रय तावडे यांनी सदरची घटना पाचोरा वनविभागाला कळवली.
विहिरीतून बाहेर काढल्यावर वनविभागाचे गाडीत टाकतांना कळमसरा ग्रामस्थ.
माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी नांद्रा बिटचे वनरक्षक मा.श्री. ठाकरे, मालखेडा बिटचे वनरक्षक मा.श्री. सुर्यवंशी, वनमजूर अशोक राठोड यांना सोबत घेऊन यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांनी याच परिसरातील शेतकरी मा.श्री. शांताराम बोखारे, मा.श्री. रमेश पाटील, मा.श्री. गणेश खेडकर, मा.श्री. बाबूलाल परदेशी, मा.श्री. मंगल परदेशी, मा.श्री. आकाश बोखारे यांची मदत घेऊन दोराच्या साह्याने विहिरीत खाट (बाज) सोडून मृत बिबट्याला वर काढून शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपासणी व कार्यवाही करीता वनविभागाने ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळी पंचनामा करतांना वनविभागाचे कर्मचारी.
याबाबत कळमसरा येथील गंगा नर्सरीचे मालक निसर्गस्नेही मा.श्री. दत्तात्रय तावडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांच्या मते सदरच्या दुर्घटनेची परिस्थिती अभ्यासली असता, परिसरात पाण्याची मुबलकता आहे. म्हणजेच या बिबट्याचा बळी पाण्याच्या शोधात झालेला नसून भक्ष्याच्या शोधार्थ किंवा भक्ष्याची शिकार करण्यासाठी पाठलाग करत असतांना तोल जाऊन विहिरीत पडून मरण पावला असावा. तसेच विहिरीजवळ भलेमोठे पिंपळाचे महावृक्ष आहे तेथे नेहमी माकडांचा वावर असतो शिकारीच्या शोधार्थ तोल जाऊन पाण्यात पडला असावा अंदाज व्यक्त केला आहे.