वक्रतुंड सॉ मिलवर वन विभागाची वक्रदृष्टी, चार दिवसांपासून लाकुड साठा व कागदपत्रांची तपासणी सुरु.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०२/२०२४
पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनची पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून पाचोरा, भडगाव, जामनेर तालुक्यात दररोज हजारो हिरव्यागार वृक्षांची स्वयंचलित मिशनच्या साह्याने विनापरवाना दिवसाढवळ्या बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. ही वृक्षतोड जामनेर, शेंदुर्णी, लोहारा, पाचोरा, भडगाव या लाकुड वखारींच्या संचालकांच्या छत्रछायेखाली व कृपाशीर्वादाने केली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कारण या तिघही तालुक्यातील अनाधिकृत लाकुड व्यापारी हे बिनधास्तपणे वृक्षतोड करुन ही लाकडे जामनेर, पाचोरा, भडगाव, शेंदुर्णी, लोहारा येथील लाकुड वखारीवर नेऊन विकतांना दिसून येत आहेत.
असाच काहीसा गैरप्रकार पाचोरा तालुक्यातील भोजे येथील वक्रतुंड सॉ मिलमध्ये मागील काही वर्षांपासून सुरु आहे. परंतु आता कुणीतरी एका समाजसेवकाने बेसुमार होणारी वृक्षतोड थांबवून पर्यावरणाच्या रक्षणासाठी तक्रार केली होती अशी माहिती समोर येत असून या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भोजे येथील वक्रतुंड सॉ मिल येथे मागील चार दिवसांपासून धाडसत्र राबवून चौकशी सुरु केली असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती लागले आहे. यामुळे वक्रतुंड सॉ मिल वर वन विभागाची वक्रदृष्टी पडली असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
जळगाव येथील वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व काही कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भोजे येथील वक्रतुंड सॉ मिलची चौकशी केली जात असून ही चौकशी कुणाच्याही दबावाला बळी न पडता काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. कारण या वक्रतुंड सॉ मिलमध्ये मागील काही वर्षांपासून विरप्पनलाही मागे टाकले असून अवैध लाकुड व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देऊन मोठ्या प्रमाणात अवैध लाकुड खरदी करुन एकप्रकारे निसर्गसंपदेची मोठ्या प्रमाणात चोरी केली आहे. म्हणून या वक्रतुंड सॉ मिलची सखोल चौकशी होऊन आत्ताच्या परिस्थितीत असलेले वखारीजवळ तसेच इतर खाजगी व काही शासकीय भूखंडावर अनाधिकृतपणे साठवलेला लाकुड साठा कसा व कुठुन आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लाकुड साठा आढळून आला असला तरी हे लाकुड वखारीवर घेतांना शासकीय नियमानुसार घेतले आहे का ? जर हे लाकुड शासकीय नियमानुसार घेतले असेल तर मग याची वनविभागाकडून रितसर परवानगी घेतली आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. म्हणून संबंधित चौकशी पथकाने कुणाच्याही दबावाला बळी न पडता सखोल चौकशी करुन लाकुड साठा जप्त करुन वक्रतुंड सॉ मिलवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी असंख्य निसर्गप्रेमी वृक्ष प्रेमींनी केली आहे.
वास्तविक पाहता अशी चौकशी व कारवाई सर्वदूर झाली पाहिजे अन्यथा ही बेसुमार होणारी वृक्षतोड अशीच सुरु राहिली तर भविष्यात नक्कीच निसर्गाचा समतोल ढासळून आपणास मोठ्या नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागेल यात शंका नाही.
(संबंधित चौकशी अधिकारी यांना भेटून सविस्तर वृत्त लवकरच)