कळमसरा गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गटारीचे पाणी रस्त्यावर, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०१/२०२४
पाचोरा तालुक्यातील कळमसरा हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून काही भागात सांडपाण्याच्या गटारीची दुरावस्था झाली असल्याने गाव परिसरात सांडपाणी रस्त्यावर येऊन मोठे डबके साचले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कळमसरा गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तसेच आबा माधव चौधरी, देवानंद तोताराम सोनवणे व लक्ष्मण पोस्ते यांच्या घरासमोरुन गेलेल्या सांडपाण्याच्या भुमिगत गटारींची तसेच चेंबरची साफसफाई केली गेली नसल्याने या परिसरात गटारीचे पाणी रस्त्यावरुन वाहात आहे. या परिसरात पाण्याचे डबके साचले असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त निघालेल्या प्रभातफेरीतील विद्यार्थ्यांना याच पाण्याच्या डबक्यातून जावे लागले हे दृष्य पाहून कळमसरा गावातील सुज्ञ नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
म्हणून आतातरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या भुमिगत गटारींची त्वरित साफसफाई करुन ग्रामस्थांची अडचण दुर करावी अशी मागणी केली जात आहे.