भोजे ते राजुरी फाटा रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात, कलाकृती शोधा व बक्षिसे मिळवा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०३/२०२२
रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. असे फलक सगळीकडे लावलेले दिसून येतात म्हणून ते आपल्या वाचनात येतात. परंतु ज्या रस्त्यावर हे फलक काळजीपूर्वक लावले जातात तेच फलक लावणाऱ्या विभागाला या फलकावर लिहिलेल्या मजकुराचा अर्थ कळत नसावा किंवा फक्त आणि फक्त लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण स्वतः कोरडे पाषाण अशी वर्तणूक सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे का ? अशी शंका निर्माण होते.
कारण आजच्या परिस्थितीत एकाबाजूला मोठ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरणाचे काम झपाट्याने सुरु आहे. दुसरीकडे मात्र ज्या खेडेगावावर सगळे व्यवहार अवलंबून आहेत त्या खेडेगावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याचे दिसून येते व हे पाहिल्यावर ‘खेड्याकडे चला’ हा नारा फोल ठरत आहे हे सिद्ध होते.
अश्याच खेडेगावातल्या रस्त्यापैकी एक रस्ता म्हणजे पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर ते वरखेडी दरम्यानचा भोजे ते राजुरी फाटा रस्ता हा आजच्या परिस्थितीत शेवटची घटिका मोजत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून काही भागातील रस्त्यावर तर डांबर दाखवा व बक्षिस मिळवा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या खड्डेमय रस्त्यावरुन वाहन चालवतांना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते तर वाहनातून प्रवास करत असलेल्या प्रवाशांना घरी गेल्यावर अंगदुखी थांबण्यासाठी वेदनाशामक औषधे घ्यावी लागतात. तसेच या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. तर वाहनधारकांना दोन ते तीन दिवसात आपल्या वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी गॅरेजमधे जाऊन खर्च करावा लागतो आहे.
या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी वारंवार मागणी करुनही या रस्त्याचे नुतनीकरण केले जात नाही. फक्त रस्त्यावर पडलेल्या खड्यांची तात्पुरती थातुरमातुर डागडुजी करुन जणू रस्ता नुतनीकरणाची मागणी करणारांच्या जखमेवर मीठ चोळले जाते अशा भावना सुज्ञ नागरिक व्यक्त करतात. तसेच आज भोजे ते राजुरी फाटा या रस्त्यावर पडलेल्या खड्यांची परिस्थिती पाहिली असता या रस्त्यावर जणू वेगवेगळ्या कलाकृती कोरल्या असाव्यात असा भास होतो. या रस्त्यावरील कलाकृती शोधण्यासाठी स्पर्धा आयोजित करून या स्पर्धेत फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींनाच बोलवून कलाकृती शोधा व बक्षिस मिळवा असे आवाहन करावे अशी प्रतिक्रिया या रस्त्यावरून जाणारे वाटसरु व वाहनधारक संतापाने सांगतात.
येत्या आठ दिवसात भोजे ते राजुरी फाटा रस्त्याचे नूतनीकरण न झाल्यास येणाऱ्या जिल्हापरिषद व पंचायतसमिती निवडणूकांवर चिंचपुरे, भोजे, वरखेडी, पिंपळगाव हरेश्वर या गावातील सुज्ञ नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा सुरु आहे. म्हणून आता तरी त्वरित नूतनीकरण सुरू करावे अशी मागणी होत आहे.