जिवंत व्यक्तीला मयत दाखवून स्थावर मालमत्तेच्या हेराफेरी प्रकरणी लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/१२/२०२३
पाचोरा शहरातील नामांकित कायदेतज्ञ ॲड. दिपक विठ्ठल पाटील यांच्या स्वमालकीचा पाचोरा शहरातील पुनगाव रस्त्यावर प्लॉट क्रमांक ९६/२/१३२ हा बक्कळ प्लॉट असून त्यांनी काल दिनांक ०५ डिसेंबर २०२३ मंगळवार रोजी या गटाचा ऑनलाईन सेंटरवर जाऊन उतारा काढला असता त्यांना उताऱ्यावर स्वता हयात असतांनाही स्वताच्याच नावाची नोंद मात्र मयत असल्याचे दिसून आले होते. ही नोंद पाहून कायदेतज्ञ ॲड. दिपक पाटील यांना धक्काच बसला थोडक्यात सांगायचे झाल्यास ‘याची देही याची डोळा पाहिला मी माझ्याच मृत्यूचा सोहळा’ असे म्हणण्याची वेळ कायदेतज्ञ ॲड. दिपक पाटील यांच्यावर आली आहे.
महसूल विभागाने कायदेतज्ञ ॲड. दिपक पाटील हे हयात असतांना सुध्दा यांची दिनांक २८ ऑगस्ट २०२० मध्येच मयत झाल्याची दप्तरी नोंद केली असल्याचे उघड झाले आहे. या चुकीच्या नोंदीने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. या गैरप्रकाराबाबत कायदेतज्ञ ॲड. दिपक पाटील यांनी आज दिनांक ०६ डिसेंबर २०२३ बुधवार रोजी मा. जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांची नुकतीच भेट घेऊन संबंधित घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता ॲड. दिपक पाटील म्हणाले की हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून महसूल प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे व हलगर्जीपणामुळे मला नहाकच मनस्थाप सहन करावा लागत असून या हेराफेरी प्रकरणी माझ्या विरोधात हा कट असावा असा संशय व्यक्त केला असून आता उताऱ्यावर परत दुरुस्ती करुन घेण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे तसेच आर्थिक झळ बसणार असल्याने याप्रकरणी मी आता उद्या दिनांक ०७ डिसेंबर २०२३ गुरुवार रोजी संबंधित घटनेला जबाबदार असलेले सर्कल व तलाठी यांच्या विरोधात मा. प्रांताधिकारी पाचोरा यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.