दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०१/२०२४

गेल्या काही वर्षांपासून सगळीकडेच लग्न व विविध समारंभ समारंभ, गावातील सामाजिक उत्सव, धार्मिक उत्सव, देवदेवतांच्या मिरवणूका, नेत्यांचे वाढदिवस, निवडणूक निकाल लागल्यानंतर काढण्यात येणाऱ्या विजयी मिरवणूकी धुमधडाक्यात साजऱ्या करतांना डीजे वाजवण्याची आवड दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामागील कारण म्हणजे कोणत्याही कार्यक्रमात डीजे वाजवणे हा एक प्रतिष्ठेचा विषय ठरत असल्याने याच आनंदमय सोहळ्यात अतिउत्साही युवक डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचतांना दिसून येतात मग नाचगाणी करतांना अंगात उर्जा निर्माण झाली पाहिजे म्हणून बरेचसे तरुण तुर्क व म्हातारे अर्क, अल्पवयीन लहान, लहान नवतरुण कधी स्वताच्या पैशांची तर कधी फुकाची मिळणारी दारु बिनधास्तपणे पितात व पितांना दिसून येतात दारु कुणीही पाजत असल तरी पोट व आरोग्याचा विचार न करताच मनसोक्तपणे ढोसून नाचत असतात.

परंतु हे करत असतांनाच दुसरीकडे डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने सर्वसामान्य जनतेला किती अचणींचा सामना करावा लागतो याबाबत कुणीही विचार करत नाही. यामुळे आसपासच्या परिसरातील जनता रस्त्यावरुन जात असतांना रस्त्यावर असलेल्या शाळा, कॉलेज, संस्कार केंद्र विशेष महत्वाचे म्हणजे लहानमोठे दवाखाने मोठमोठ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले अत्यावस्त परिस्थितीत असलेले रुग्ण यांना या कर्णकर्कश व मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात डीजे वाजवत असल्याने आवाजाचा जिवघेणा त्रास होतो. तसेच लेझर किरणांचा वापर केला जात असल्याचे दिसून येते यामुळे कर्णकर्कश आवाजाने पत्र्यांची घर असली तर सांगायचा प्रश्नच उरत नाही कारण सिमेंटच्या भिंतीची घर व घराचे छत सुध्दा या बीजेच्या निघणाऱ्या कर्कश आवाजाने हादरतात व भुकंप होतोय की काय असा भास होतो मग यापुढे तुमच्या आमच्या ह्रदयाला किती त्रास व आपल्या रक्ताभिसरणावर किती वाईट परिणाम होत असेल याची कल्पना न केलेली बरी व यातुनच काही ठिकाणी एकाबाजूला वाद्य वाजवत असतांनाच दुसरीकडे काहींना ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. रात्रीच्या वेळी डीजेच्या कर्कश आवाजाने झाडाझुडुपांमध्ये आपल्या घरट्यात बसलेली पाखर जीव मुठीत घेऊन उडून जातात रात्रीच्यावेळी त्यांना ठळक दिसत नसल्याने बरेचसे पक्षी घरट्याकडे न येता भरकटून त्यांना जीव गमवावा लागतो तसेच मोठ्या प्रमाणात ध्वणी प्रदुषण होऊन त्याचे दुष्परिणाम होत आहेत. तासंतास चालणाऱ्या मिरवणुकीमुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन कधी, कधी दवाखान्यात जाणारे रुग्णांना वेळेवर दवाखान्यात जाता येत नसल्याने एखाद्यावेळी एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे नाच, गाण्याच्या नादात विवाह सोहळा वेळेवर पार पडत नसल्याने लांब, लांबून आलेल्या पाहुण्यांना घराकडे वेळेवर जाण्यासाठी धावपळ करावी लागते असे असले तरी ही समस्या कुणी व कुणाकडे सांगायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच डीजेचे वाद्य लग्नसमारंभात तसेच इतर शुभप्रसंगी वाजवणे म्हणजे एक प्रतिष्ठेचा विषय ठरत असल्याचे पाहून डीजे मालकांनी समारंभ कोणताही असो जर तुम्हाला डीजे पाहिजे असेल तर एक लाख रुपयांपासून तर पूढे अडीच लाख रुपयांचे दर ठेवले आहेत. यात विशेष बाब म्हणजे या मिरवणुकीत अल्पवयीन तरुणींना नाचगाणी करण्यासाठी आणले जात असल्याने मदिरा, मिनाक्षीच्या नादात लाखो रुपयांचा चुराडा सोबतच याच आनंदमय वातावरणात हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

म्हणून सर्व गावागावातील समाजबांधवांनी एकत्रित येऊन डीजे वाद्य लग्नसमारंभात तसेच इतर कोणत्याही सणासुदीच्या काळात वाजवणार नाही अशी शपथ घेऊन शुभप्रसंगी फक्त कमी आवाजाच्या पारंपरिक वाद्यांच्या वापर करण्याची सुरुवात केली तर नक्कीच पैसा, वेळ वाचेल अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.