अंबे वडगाव परिसरात विद्यूत चोरांची चंगळ तर विद्युत ग्राहकांना मंगळ, विद्यूत चोरांना हप्तेबाज कर्मच्याऱ्याचे अभय.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव, अंबे खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, कोकडी तांडा वडगाव जोगे, या गावातील अधिकृत विद्यूत ग्राहकांना विद्यूत वितरण कंपनीकडून स्थिर आकार, विज आकार, वहन आकार, इंधन आकार, वीज शुल्क, वीज विक्री कर, असे आकार आकारून वीज बिल दिले जाते तसेच विशेष म्हणजे विद्यूत वितरण कंपनी एवढ्यावरच थांबत नसून थकीत वीज बिलावर व्याज आकारुन अवाजवी बिल आकारुन विद्यूत ग्राहकांना आर्थिक भू दंडासह मानसिक त्रास देत असल्याचे विद्युत ग्राहकांचे म्हणणे आहे.
तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात विद्युत वाहिनीवर आकोडे टाकून वीज चोरी सुरू आहे. परंतु यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसून येते. याबाबत सविस्तर माहिती घेतली असता नाव न सांगण्याच्या अटीवर काही लोकांनी दिलेली माहिती अशी की विद्यूत वाहिनीवर आकोडे टाकून रात्रंदिवस विद्यूत वापरण्यासाठी विद्यूत वितरण कंपनीच्या जबाबदार कर्मचाऱ्यांना हप्ते दिले जातात म्हणून या विद्यूत चोरांवर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही असे सांगितले.
तसेच थकीत विद्यूत बिलाचे वसूलीसाठी कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता हे लाईनमन, विद्यूत सहाय्यक व मदतनीस घेऊन अधिकृत विद्यूत ग्राहकांच्या घरी जाऊन तगादा लावतात व बिल न भरल्यास काही ग्राहकांचा विद्यूत पुरवठा तात्पुरता तर काही ग्राहकांचा कायमस्वरूपी खंडित करतात व बिल भरल्यानंतर पून्हा विद्यूत जोडणी साठी रकमेची आकारणी करतात.
मात्र गावागावात हे अधिकारी वसूलीसाठी येतात तेव्हा ते दिवसाढवळ्या विद्यूत तारांवर आकोडे टाकून विद्यूत चोरी होत असल्याचे पाहून सुध्दा कानाडोळा का करतात याबाबत सगळी परिस्थिती जाणून व समजून घेतल्यास यामागे अर्थकारण कारणीभूत असल्याचे बोलले जाते. म्हणून (विद्यूत चोरांची चंगळ तर विद्यूत ग्राहकांना मंगळ) असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे मत सुज्ञ नागरिकांनी सत्यजीत न्यूज कडे बोलतांना व्यक्त केले.