दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०१/२०२४

शासनाने नुकताच हिट अँड रन (Hit and Run Act) कायदा लागू केला असून हा कायदा लागू करतांना वाहन चालक व वाहन मालकांना विश्वास न घेताच हुकुमशाही पध्दतीने लागू केला असल्याने वाहन चालक व वाहन मालकांनी या कायद्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण भारतभर रस्त्यावर वाहने थांबवून रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील भाऊबंद संघटनेतर्फे आज दिनांक ०३ जानेवारी २०२४ बुधवार रोजी स्वयंमस्पृतिने एक दिवस आपली वाहने बंद ठेऊन सकाळी शेंदुर्णी येथील पहुर नाक्यावर रस्ता रोको करत शासनाने लागू केलेला हिट अँड रन (Hit and Run Act) कायदा लागू होऊ नये जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करत शासनाचा निषेध केला आहे.

तदनंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांनी उपनिरीक्षक मा. श्री. दिलीप पाटील यांना आंदोलनस्थळी पाठवून आंदोलनकर्त्यांना भेटून चर्चा करत त्यांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी भाऊबंद मालक, चालक संघटनेतर्फे उपनिरीक्षक मा. श्री. दिलीप पाटील यांना निवेदन देऊन हिट अँड रन (Hit and Run Act) कायदा लागू होऊ नये अशी मागणी करत आमच्या मागण्या शासनदरबारी पाठवून पाठपुरावा करुन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी व विनंती केली.

याप्रसंगी भाऊबंद मालक, चालक संघटनेचे उपाध्यक्ष युवराज बारी, सादिक खाटीक, संतोष चौधरी, सचिव संजय सुर्यवंशी, जावेद शेख, शरद निकम, रवी पाटील, गफूरभाई तडवी, सुनील काळे, रफिक शेख, झहीर शेख, अशोक बारी, विनोद बारी, राजू पाटील, राहुल पाटील, हिंम्मत पाटील, दिपक मोरे, रामधन परदेशी व बहुसंख्य वाहन चालक व मालक गावातील सुज्ञ नागरिक, व्यापारी वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते.
*************************************************************
‘चालक, मालक संघटनेचे उपाध्यक्ष मा. श्री. युवराज बारी’ यांची प्रतिक्रिया.
*************************************************************

शासनाने हिट अँड रन (Hit and Run Act) कायदा लागू करतांना वाहन चालक व मालक यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता फक्त आणि फक्त उंटावरुन शेळ्या चारणाऱ्या व कागदी घोडे नाचणाऱ्या काही लोकांना हाताशी धरुन हा कायदा अंमलात आणला आहे. आम्ही वाहन चालक व मालक आमचे वाहन चालवतांना सुईच्या टोकावर वाहन चालवत असतो तसेच आजच्या परिस्थितीत काही रस्ते वगळता इतर रस्त्यांची झालेली दुरावस्था तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी हवे असलेले सुचना फलक, गतीरोधक, वाहनांची तसेच सिग्नल यांची झालेली दुरावस्था पाहाता वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागते.

त्यातल्या त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत सगळीकडे रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करुन हॉटेल, बिअर बार, दारुची दुकाने व विविध व्यवसायीकांची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी ग्राहकांची सतत वर्दळ असते विशेष म्हणजे भररस्त्यावर काही मान्यताप्राप्त तर काही ठिकाणी अवैधरित्या रात्रंदिवस दारु विक्री केली जात असल्याने रस्त्यावरुन पायी चालतांना दारुच्या नशेत असलेले तळीराम रस्त्याचे माप काढत थोडक्यात सांगायचे तर तर झोकांड्या खात चालतात यातच भरीत भर बरेचसे दारुचे शौकीन दारुच्या नशेत भररस्त्यावर वाहन चालवतांना नागमोडी वळणे घेत वाहन चालवतात तर काही मुद्दामहून कटबाजी करत स्टंट करतात व वाहनधारकांशी वाद घालतात.

अश्याही परिस्थितीत आम्ही वाहन चालवतांना साधा बेडूक, साप किंवा लहानसा प्राणी जरी आमच्या गाडीसमोर आला तर त्यालाही वाचवण्यासाठी आम्ही धडपड करत असतो व असा कोणताही वाहन चालक किंवा मालक हा मुद्दामहून अपघात घडवून आणेल हे कदापि शक्य नाही. वाहन चालवतांना बरेचसे लहान वाहनधारक आमच्या वाहनासमोर येऊन धडकतात किंवा मागच्या बाजूने आमच्या वाहनावर धडक मारतात अशावेळी अपघात झाल्यास त्याला आम्ही मोठे वाहनधारकच जबाबदार धरले जातो हा आमच्यावर होणारा एक प्रकारे अन्यायच आहे.

विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर आम्ही अपघातस्थळी थांबतो परंतु यावेळी अपघात कसा झाला याला कोण दोषी आहे याची विचारपूस न करताच सगळेच आम्हाला मोठा गुन्हेगार समजून मारठोक करतात अशा बऱ्याचशा घटनांमध्ये आजपर्यंत जमलेल्या जमावाने वाहन चालकांचा बळी घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. आम्ही दोन घास सुखाचे मिळावे म्हणून कधी आठ दिवस तर कधी महिना, महिना बायका, पोरांना सोडून आमची वाहने घेऊन रस्त्यावर जात असतो तेव्हा आमच्या डोळ्यात उद्याची स्वप्नं असतात की काम केल्यानंतर मिळणाऱ्या पैशातून मुलाबाळांच्या गरजा पुर्ण करु व आपला बाप, आपला घरधनी घरी येईल या आशेवर आमच कुटुंब आमची वाट पहात असतांना आम्ही सुखरुप घरी कसे जाऊ म्हणून व्यवस्थीत वाहन चालवत असतो आम्ही मुद्दामहून अपघात करत नाही तसेच (ज्याप्रमाणे जन्म आहे तर मृत्यूही अटळ आहे, तसेच वाहन तयार झाल्यावर वाहन रस्त्यावर आहे तर अपघात होणारच) असे असले तरी शासनाने कोणताही विचार न करता हिट अँड रन (Hit and Run Act) कायदा लागू करुन चालक व मालकांवर अन्याय केला आहे. असे मत चालक, मालक संघटनेचे उपाध्यक्ष मा. श्री. युवराज बारी व्यक्त केले आहे.