मालखेडा गावाजवळ सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली, घातपात झाला असल्याचा मयताच्या नातेवाईकांचा संशय.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१०/२०२३
(नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथे रवाना करण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.)
अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या जामनेर तालुक्यातील मालखेडा ते अंबे वडगाव दरम्यान राखीव जंगलाच्या हद्दीतील जामनेर ते पाचोरा रस्त्यालगत आज दिनांक १६ ऑक्टोंबर २०२३ सोमवार रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास एक पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मालखेडा, अंबे वडगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मालखेडा गावातील जनमानसातून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मयत इसम हा मालखेडा येथील रहिवासी भारत राजमल नाईक अंदाजे वय ३८ वर्षे याचा असल्याचे बोलले जात आहे. मयत भारत हा अल्पभूधारक शेतकरी असून परिस्थिती गरिबीची असल्याने घरी शेती कसणे शक्य नसल्याने त्याने स्वताची शेतजमीन दुसऱ्याला भाडेतत्वावर दिली असून मयत भारत हा मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवत होता. तसेच तो आता ऊसतोडणीच्या कामासाठी जाणार असल्याने त्याने ऊसतोड मुकादमाकडून काही पैसे उचल घेतले होते.
दसरा नवरात्री आटोपल्यावर तो ऊसतोडणीच्या कामासाठी जाणार असल्याने मागील तीन दिवसांपूर्वी दोन इसम त्याच्या घरी आले होते. या दोन इसमांनी मयत भारत नाईक याला तीन कॉटर दारु पाजली भारत व बाहेरगावाहून आलेले दोन इसम हे दारु पित असतांना त्यांनी भारत मागे एकतर कामाला चाल नाहीतर पैसे देऊन टाक असा तगादा लावला होता. तसेच यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती अशी जोरदार चर्चा ऐकायला मिळते असली तरी मालखेडा गावातील चर्चेतून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असल्याने भारत नाईक याचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला हे पोलीस तपासाअंतीच सिध्द होईल एवढे मात्र खरे.
तसेच मयत भारत याने गरजेपोटी एक नव्हे तर एकुण तीन ऊसतोड मुकादमाकडून प्रत्येकी पन्नास, पन्नास हजार रुपये उचल घेतला होता हा प्रकार मुकादमांना माहीत पडल्यानंतर या दोन इसमांनी घरी येऊन ऊसतोडणी कमाला चालावेच लागेल असा तगादा लावला होता अशी माहिती समोर येत आहे. या चर्चेमुळे संबंधित ते दोन इसम कोण याबाबत मालखेडा गावासह पंचक्रोशीतील गावागावातून उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत असल्याने खरा प्रकार काय असेल याबाबत उत्सुकता लागली आहे.
मयत भारत याच्या पाश्चात्य पायल (१२) वर्षे, कोयल (१०) वर्षे या दोन मुली व सोपान नावाचा आठ वर्षाचा मुलगा व पत्नी रेणुकाबाई असा परिवार उघड्यावर आला आहे.